मुंबई : क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) आरोप मागे घेतल्यानंतर एक महिन्याने अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने विशेष न्यायालयात धाव घेतली आहे. यात पारपत्र परत करण्याची मागणी त्याने केली आहे. त्याच्या अर्जावर १३ जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने एनसीबीला दिले आहेत.

एनसीबीने आर्यनसह सहा जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले नाही. त्याच पार्श्वभूमीवर आर्यनने हा अर्ज केला आहे. त्यात प्रकरणातून दोषमुक्त केल्याचा औपचारिक आदेश देण्याची तसेच जामीन मंजूर करताना घातलेली बंधपत्राची अटही रद्द करण्याची मागणी केली आहे. विशेष न्यायालयासमोर आर्यनच्या या अर्जावर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी न्यायालयाने या अर्जावर एनसीबीला उत्तर दाखल करण्यास सांगून प्रकरणाची सुनावणी १३ जुलै रोजी ठेवली.

पुरेसे पुरावे नसल्याचे सांगून क्रूझवरील अमली पदार्थ पार्टीप्रकरणी आर्यन खानसह सहाजणांवरील आरोप मागे घेतल्याचे एनसीबीने २७ जून रोजी स्पष्ट केले होते. तसेच प्रकरणाच्या नव्याने चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने वस्तुनिष्ठ पद्धतीने तपास केला. केवळ साशंकतेच्या पलीकडे ठोस पुरावे मिळवण्याच्या तत्त्वाचा वापर या प्रकरणाचा तपास करताना केला गेला, असा दावाही एनसीबीने केला होता. क्रूझवर छापा टाकण्यात आला, तेव्हा आर्यन आणि अन्य काहीजण वगळता उर्वरित आरोपींकडे अमली पदार्थ सापडले. त्यामुळे आर्यनसह सहाजणांविरोधात पुरेशा पुराव्याअभावी तक्रार दाखल केली गेलेली नाही, असेही एनसीबीने स्पष्ट केले होते.