मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (‘बीएनएचएस’) अतिसंकटग्रस्त, संकटग्रस्त आणि संकटसमिप असलेल्या ४५ प्रजातींच्या पक्ष्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये संघ टिटवी, राजगिधाड, पांढरपाठी गिधाड, गुलाबी डोक्याचे बदक यासह सात पक्षी प्रजाती अतिसंकटग्रस्त असल्याचे निरीक्षण संस्थेने नोंदविले आहे.

पक्षी जैवविविधतेतील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. पक्ष्यांच्या विविध प्रजाती आणि त्यांची योग्य संख्या यावर निसर्गाचा समतोल अवलंबून असतो. पर्यावरण संतुलनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या पक्ष्यांच्या अनेक प्रजाती अधिवासातील मानवी हस्तक्षेपासह अन्य कारणांमुळे संकटग्रस्त झाल्या आहेत. जैवविविधता दिनानिमित्त ‘बीएनएचएस’ने जाहीर अशा ४५ पक्षी प्रजातींची यादी जाहीर केली आहे. त्यानुसार अतिसंकटग्रस्त सात, संकटग्रस्त नऊ, तर संकटसमिप गटात २९ प्रजातींचा समावेश आहे. महाराष्ट्रात काही वर्षांपूर्वी मोठय़ा संख्येने माळढोक आढळत होते. मात्र माळरानावरील अतिक्रमणांमुळे आता अवघे दोनच माळढोक राहिले आहेत. झुडपी जंगलात आढळणारा ‘जेर्डनचा धाविक’ही मोजक्या संख्येने राहिला आहे. तसेच पानझडी अधिवासातील ‘रानिपगळय़ां’ची संख्याही झपाटय़ाने कमी होत आहे. स्थलांतर करून येणारा मोठा ‘क्षेत्रबलाक’ गेली अनेक वर्षांपासून आढळला नसल्याने राज्यातून नामशेष झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. राज्यातील अनेक भागात आढळणारे पांढरे गिधाड, तसेच पांढऱ्या पुट्ठय़ाचे गिधाड अभावानेच दृष्टीस पडत आहे.

अकोला, वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ आदी भागांमध्ये आढळणारा तणमोर आता अधिवास व शिकारीमुळे कमी संख्येत राहीला आहे. नदीकाठी होत असलेल्या मानवी अतक्रिमणांमुळे काळय़ा पाठीचा सुरयदेखील दुर्मिळ होत चालला आहे. पल्लासच्या मत्स्य गरूड, स्टेपी ईगल या शिकारी पक्ष्यांच्या प्रजातीही संकटात आहेत. संकटसमिप असलेल्या प्रजातीत २९ प्रजातींमध्ये लाल डोक्याचा ससाणा, करण पोपट, नदी टिटवी, गुलाबी छातीचा पोपट, पांढुरक्या भोवत्या, तीरंदाज (सापमान्या), मलबारी कवडय़ा धनेय, लग्गर ससाणा, राखी डोक्याचा मत्स्य गरूड, राखी डोक्याचा बुलबुल, नयनसरी बदक, युरेशियन कुरव, कुरल तुतारी, करडे गिधाड, काळय़ा शेपटीचा मालगुजा, छोटा रोहित, काळय़ा मानेचा करकोचा, ब्लॅक हेडेड गॉडविट, कोलव फोडय़ा, तुरेवाली टिटवी आदींसह अन्य दोन प्रजातींचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्ष्यांना कसला धोका? उच्च दाबांच्या तारा, तसेच पवनचक्कीच्या धारदार पात्यांना अडकून अनेक पक्षी मरण पावतात. पक्षी अनेकदा भटक्या कुर्त्यांचेही भक्ष्य होतात. मृत गुरांच्या मासाची चणचण, वाढते साथीचे रोग, गुरांमधील प्रतिजैविके याचा पक्ष्यांच्या वंशवृद्धीवर विपरित परिणाम होतो. पाणथळीच्या जागा नष्ट होत असल्यामुळे शिकारी पाणपक्ष्यांची संख्या घटली आहे. मोठय़ा विकासकामांमुळे माळरानाची तोड, तापमानवाढ, कीटकनाशकांचा वापर पक्ष्यांच्या जीवावर बेतले आहे. यावर वेळीच उपाययोजना न केल्यास अनेक प्रजाती कायमच्या नष्ट होतील, अशी भीती पक्षीतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.