मुंबई : पश्चिम घाटाच्या डोंगर उतारांवर आणि गवताळ भागांमध्ये पावसाच्या पहिल्याच सरींसोबत एक नाजूक, शुभ्र फुल उमलते. ते ‘आषाढ हबेअमरी’ या नावाने ओळखले जाते. ही वनस्पती ऑर्कीड कुळातील असून प्रदेशनिष्ठ आणि नाजूक फुलांपैकी एक मानली जाते. या फुलाची वैशिष्ट्यपूर्ण ओळख म्हणजे पांढरे, नाजूक फुल आणि हृदयाकृती एकच पान. त्यामुळे ही वनस्पती सहजपणे लक्ष वेधून घेते. वनस्पती वर्गीकरण शास्त्रज्ञ अक्षय जंगम यांनी आपल्या कॅमेऱ्यात कोल्हापूर येथील केर्ले गावात आषाढ हबेअमरीची छायाचित्रे टिपली आहेत.
मुख्यतः पावसाळ्याच्या सुरुवातीलाच उमलणाऱ्या या फुलाचे परागीभवन पतंगांमार्फत होते. हे फुल रात्री पतंगांना आकर्षित करते आणि त्याच माध्यमातून त्याचे पुनरुत्पादन शक्य होते. हे निसर्गातील एक सुरेख जैविक नाते आहे. पश्चिम घाटातील जैवविविधतेच्या खजिन्यातील ‘आषाढ हबेअमरी’ ही एक मौल्यवान वनश्री आहे. दरवर्षी आषाढात उगवणाऱ्या हबेअमरीसारख्या वनस्पती निसर्गाच्या शाश्वततेची आणि सौंदर्याची साक्ष देतात. या फुलांचा फुलण्याचा काळ जून ते ऑगस्ट (विशेषतः आषाढ महिन्यात) असतो. एका देठावर १ ते ५ पांढरी फुले असतात. ही फुले पश्चिम घाटामधील मध्यम ते उंच डोंगराळ भाग, गवताळ उतार, मोकळे कुरण, थोड्या दमट जागेमध्ये निदर्शनास येतात. महाराष्ट्र, कर्नाटका, केरळ आणि तामिळनाडूमधील काही ठिकाणी ही फुले आढळतात. अनेकदा या फुलाचा आढळ पावसाच्या पहिल्या सरी नंतर होतो. त्यामुळेच “आषाढ” हे नाव स्थानिक पातळीवर प्रचलित आहे.
पर्यावरणीय महत्त्व
- ही वनस्पती पावसाळी जैवविविधतेचे प्रतीक आहे.
- पतंगांच्या परागीभवनाशी नाते असल्यामुळे एक विशिष्ट परागीप्रणालीचा भाग आहे.
- मातीतील नायट्रोजन चक्र आणि सूक्ष्मजैविकांच्या परस्परसंबंधात योगदान देणारी.
- ऑर्किड कुळातील अनेक वनस्पतीप्रमाणे हिचे बियाणे खूप बारीक आणि नाजूक असते. त्यांची उगम क्षमता मायकोरायझल फंगसच्या सहकार्यानेच शक्य होते.
आषाढ हबेअमरीचे वैशिष्ट्य
– फुलांची रचना बारीक निरिक्षणात अत्यंत नाजूक आणि कलात्मक वाटते.
– त्याच्या फुलाच्या मध्यभागी निचला पाकळीचा भाग असतो, जो फुलपाखरासारखा दिसतो.
– फुलांना मागे लांबसर शुंडीसारखा भाग असतो, ज्यामध्ये मृदू गोड रस असतो.
– पतंग हे गोडरसासाठी शुंडीसारख्या भागामध्ये शिरतात आणि त्यादरम्यान परागसंचलन घडते.
– फुलांचा मंद, पण गोडसर सुगंध रात्री अधिक प्रमाणात अनुभवता येतो, जो पतंगांना आकर्षित करतो.
– ऑर्किड्स म्हटल्यावर झाडांवर वाढणारी शोभिवंत फुलं असा विचार आपण करतो, परंतु हबेअमरी ही भूपृष्ठावर वाढणारी ऑर्किड आहे.
– ही वनस्पती केवळ आषाढात पावसाच्या सुरुवातीला काही दिवसांसाठीच उमलते. त्यामुळे तिचे दर्शन दुर्मीळ आणि खास मानले जाते.