लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : कलेच्या माध्यमातून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करताना नृत्यसंस्कृती जपली जावी या उद्देशाने मराठी कलाविश्वातील लोकप्रिय नृत्यदिग्दर्शक आणि ‘लावणीकिंग’ म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आशिष पाटील याने ‘सुंदरी’ – लावणीचा इतिहास (अदा, ताल व शृंगार) हा नवा कार्यक्रम सादर करून यशस्वी केला आहे. तालसौंदर्य उलगडत झालेले सादरीकरण आणि त्याचा आस्वाद आता अमेरिकेतील कलाप्रेमींना जुलैमध्ये घेता येणार आहे. विशेष बाब म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री व नृत्यांगना अमृता खानविलकर आणि आशिष पाटील या दोघांच्या अदाकारीने ही नृत्य मैफिल सजणार आहे.

शब्दलावण्य, भावलावण्य यांचा मिलाप साधत घडणारा देखणा कलाविष्कार म्हणजे ‘लावणी’. या कलाविष्काराला वेगळे रूप देत आपली संस्कृती व परंपरा जपण्याचा प्रयत्न आशिष पाटील याने ‘सुंदरी’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला आहे. लय-तालाचा आविष्कार, रंगमंचीय सहजता, आत्मविश्वास या सर्व गोष्टींच्या जोरावर विलोभनीय नृत्याविष्काराचे दर्शन ‘सुंदरी’ कार्यक्रमातून घडविण्यात आले आहे. मुंबईत ‘सुंदरी’ कार्यक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्यानंतर हा कार्यक्रम जुलै महिन्यात अमेरिकेत रंगणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संगीतातून आणि तितक्याच लयबद्ध नृत्याविष्कारातून, त्यातील भावभावनांचे लोभसवाणे सादरीकरण प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा आशिष पाटील प्रयत्न करीत आहे. ‘सुंदरी’ हा अविस्मरणीय कार्यक्रम मनाचा ठाव घेतो, अशा शब्दांत रसिक प्रेक्षक आणि मान्यवरांनी कलाकारांचे कौतुक केले आहे.