ॲड. आशीष शेलार
कोकणपट्टीतल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी माझी सुमधुर मालवणी भाषा संपूर्ण महाराष्ट्रात आणि जगभरात पोहोचवणारे गंगाराम ऊर्फ नाना गवाणकर गेले आणि मालवणी बोली, मालवणी मुलूख, मालवणी रसिक आणि अवघी नाट्यसृष्टी भाषा काही काळ सुन्न झाली. मराठीला अभिजात दर्जा मिळण्यामध्ये मराठीच्या जवळपास ४२ हून अधिक ज्या नोंदणीकृत बोली भाषा आणि त्याहून अधिक त्यांचे प्रकार यांचा महत्त्वाचा वाटा आहे. एका अभ्यासात २५० बोली आहेत असेही समोर आले आहे. त्यातील मालवणी प्रमुख आहे आणि गंगाराम गवाणकर, जयवंत दळवी अशा अनेकांनी मालवणी भाषा समृद्ध केली आहे.

मालवणी भाषेची अत्यंत समृद्ध परंपरा आहे. मालवणी कोकणी माणसाचा अस्सल इरसालपणा, हजरजबाबीपणा, वरून काटे आणि आतून मधुर गरे असलेला फणसासारखा स्वभाव आणि जीवनातील शहाणपणा, सकारात्मकता मालवणी भाषेतही पुरेपूर उतरलेला आहे. परंतु तो तितक्याच ताकदीने पण सोप्या रीतीने नाटक, लेखनातून मालवणेतर समाजांपर्यंत पोहोचवून मालवणीला प्रतिष्ठा मिळवून देणारे गंगाराम नाना गवाणकरांसारखे लेखक विरळाच. ‘वस्त्रहरण’सारखे नाटक मालवणी भाषेची वैशिष्ट्ये उजळवतानाच समाजातील कुरीतींवर सहज टिपण्या करत जाते; परंतु ते आजकालच्या काही सवंग प्रकारांसारखे अंगावर येत नाही, हे गंगाराम नाना गवाणकरांचे वैशिष्ट्य.

माझा त्यांचा स्नेह जुना

काही महिन्यांआधीची गोष्ट असेल… ‘वस्त्रहरण’कार नाना गवाणकरांना भेटण्याचा फक्कड योग जुळून आला. आम्ही जेवायला बसलो असताना बऱ्याच नाटकांवर चर्चा झाली. कुतूहलाने त्यांचा माडबन ते मुंबई प्रवास ऐकताना त्यांचे खूप कौतुक वाटत राहिले. लहानपणीच्या संघर्षमय जीवनाशी दोन हात करत त्यांनी मुंबई गाठली आणि नुसते स्थिरस्थावरच झाले नाहीत तर या अवलियाने आपल्या प्रतिभेने साहित्य, नाट्यविश्व गाजवले.

८६ वर्षांच्या वयातही नानांच्या चेहऱ्यावरील हास्याने, बोलण्यातील सहजतेने आणि त्याच्या मिश्कील स्वभावाने भारावून गेलो. बोलता बोलता ते सहज बोलून गेले, “साहेबानु… कष्ट कुणाक चुकले हत काय… जे सामोरा येईत त्याका हसत हसत तोंड देवुचा…” मालवणी माणसाचे जीवन तत्त्वज्ञानच त्यांनी मला सहजतेने सांगितले होते. मी त्याना म्हटले होते, “नाना, वस्त्रहरणानंतर पुढे काय…? मला एक अस्सल मालवणी संहिता तुमच्याकडून लिहून हवी…” “काय व्हया?” त्यांचा प्रश्न. मी म्हटले, “एक नाटक लिहून द्या अस्सल मालवणी…” आणि आम्ही त्या नवीन नाटकाच्या प्रवासात खूप जवळ येत गेलो.

माडबनचे नाना गवाणकर कधीही मुंबईत आले की सकाळी सकाळी ७:३० वाजता त्यांचा फोन यायचाच. ख्यालीखुशाली व्हायची. आणि एक दिवस नाना काही जवळच्या मित्रांबरोबर मला भेटायला आले आणि अस्सल मालवणी नवीन नाटक माझ्या हातात दिले आणि म्हणाले, “सायबानु, तुम्ही बोलल्याप्रमाणे मी नाटक लीव्हलंय… आता ह्या तुमचा आसा.” स्वतः संहिता लिहूनही त्याच्या गर्वाचा लवलेशही नसलेल्या नानांचे शब्द बरेच काही शिकवून गेले.

गंगाराम नाना गवाणकरांनी ‘वस्त्रहरण’ लिहिले. कै. रमेश रणदिवे यांच्या दिग्दर्शानातून महाराष्ट्राला कै. मच्छिंद्र कांबळी नावाचा अभिनेता मिळाला… महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. ‘वस्त्रहरण’ बघताना खळखळून हसले. त्यांनाही या नाटकात काम करण्याचा मोह झाला होता. आजही अनेक आघाडीचे कलाकार ‘वस्त्रहरण’ नाटकात काम करायला मिळणे हे भाग्य समजतात…

नाना गवाणकारांबरोबर गप्पा मारताना मला लक्षात आले की, ‘माणूस वाचण्याच्या’ त्यांच्या छंदातून. ‘वस्त्रहरण’ नाटक जन्माला आले. आपल्या भोवतीच्या प्रत्येक माणसाची वागण्याची- बोलण्याची वेगवेगळी पद्धत, त्यातील विरोधाभास, वैशिष्ट्ये यांचे सूक्ष्म निरीक्षण त्यांनी ‘वस्त्रहरण’मध्ये उतरवले आहे. एकदा नानाच म्हणाले होते, “अहो, वस्त्रहरण नाटक म्हणजे जे जे स्कूलमधली एक एकांकिका व्हती. तिचा काय नाटक व्हवूचा नाय, असा सगळे तेव्हा सांगीत.” आज त्याच नाटकाने मराठी रंगभूमीवर इतिहास घडवलेला आपण पाहिला आहे.

माडबनमधून मुंबई कुठे आहे हे माहीत नसताना सहज बोटीत बसून मुंबईत आलेल्या नानांची वडिलांशी भेट १२ वर्षांनी झाली होती, पण वडिलांनी त्यांना स्वीकारले नाही. अशा कठीण परिस्थितीत एकटे पडलेल्या नानांनी मुंबईत वेळप्रसंगी बिगारी काम करून दिवस काढले. त्यांनी आयुष्याची सहा वर्षे स्मशानात झोपून काढली आणि शिक्षण पूर्ण केले. याच काळात १९६२ साली जे जे स्कूल ऑफ आर्टस् मध्ये शिकताना त्यांना नाटकाची ओढ लागली ती जीवनाच्या अंतापर्यंत कायम होती! जीपीओतील आपल्या तुटपुंज्या नोकरीच्या बळावर त्यांनी अनेकांचा सांभाळ केला, अनेकांना स्वतःच्या पायावर उभे राहायला मदत केली आहे.

गंगाराम नानांचे ‘वस्त्रहरण’ नाटक सातासमुद्रापलीकडे पोहोचले तेव्हा नानांनाही काही देश हिंडण्याचा, बघण्याचा योग आला. मुळातच माणूसपण जपणारा स्वभाव असल्यामुळे त्यांनी प्रवासवर्णन आणि ‘वस्त्रहरणा’च्या गमतीजमती पुस्तकात मांडल्या. ‘व्हाया वस्त्रहरण’ हे त्यांचे आत्मकथन त्यांच्या गप्पांइतकेच रसाळ आहे. ‘ऐसपैस’ नावाची सुंदर कादंबरीही त्यांनी लिहिली आहे. ‘वस्त्रहरण’ वगळताही त्यांनी अनेक दर्जेदार आणि लोकप्रिय नाटके लिहिली आहेत. त्यांच्या ‘वन रूम किचन’ या नाटकाचेही दोन हजारपेक्षा अधिक प्रयोग झाले आहेत. त्याचबरोबर ‘वरपरीक्षा’, ‘वर भेटू नका’ , ‘उष:काल होता होता’ अशी अनेक नाटके त्यांनी लिहिली आहेत. ते स्वतः एक उत्तम अभिनेताही होते, मात्र अभिनयापेक्षा ते लेखणीत जास्त रमले. त्यांच्या इरसाल प्रकृतीला, बौद्धिक क्षमतेला लेखन अधिक मानवले. त्यांनी ‘जागर’ या सिनेमाचे संवाद लेखनही केले होते.

आपल्या कार्यकर्तृत्वामुळे अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या नानांना मात्र महत्त्वाचे वाटत होते ते त्यांनी ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे भूषवलेले अध्यक्षपद. नानांनी आपल्या नाट्यकृतीतून आणि गप्पांमधून शिकवलेले धडे गिरवणे आणि मराठीसह मालवणी साहित्य, नाट्य क्षेत्राला होता होईल ती मदत करत राहणे, हीच गंगाराम नानांना योग्य श्रद्धांजली ठरेल.

आपल्या नाट्यकृतीतून मालवणी भाषेला जगभर प्रतिष्ठा मिळवून देणाऱ्या गंगाराम नाना गवाणकर यांचे सोमवारी निधन झाले. त्यांचे सुहृद व राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी नानांच्या आठवणी जागवत त्यांना आदरांजली वाहिली.