काँग्रेसचे हात मराठी माणसांच्या रक्ताने माखलेले असून त्याच हाताशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी केली, अशी टीका भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरेंना आता आत्मपरीक्षणाची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुंबईतील एका प्रचारसभेत ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले आशिष शेलार?

“या निवडणुकीत बऱ्याच नव्या गोष्टी बघायला मिळाल्या आहेत. अनेक बहुरुपी नेते या निवडणुकीत बघायला मिळाले आहे. काळ बदलला की रंग बदलतो हे माहिती होतं, मात्र, काही लोक अर्धा-अर्धा तासाने रंग बदलत आहेत. पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस, भाजपावर सतत्या न तपासता आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. त्यातले नंबर एकचे बहुरुपी हे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत, तर दोन नंबरचे बहुरुपी पत्रकार पोपटलाल म्हणजे संजय राऊत आहेत”, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे.

हेही वाचा – “पंतप्रधानांनी निर्लज्ज मौन…”, ‘त्या’ प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल; प्रियांका गांधींचीही संतप्त टीका!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आज उद्धव ठाकरे म्हणतात, की मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना तोडली. मात्र, आपले आमदार सोडून गेले, हे त्यांना दिसलं नाही. आज ते ज्या काँग्रेसबरोबर आहेत, त्या नराधम काँग्रेसने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यादरम्यान १०५ पेक्षा जास्त मराठी माणसांचा खून केला आहे. काँग्रेसच्या हाताला मराठी माणसांचं रक्त लागलेलं आहे, त्या काँग्रेसबरोबर उद्धव ठाकरे यांनी हातमिळवणी केली”, असेही ते म्हणाले.

“उद्धव ठाकरेंनी काँग्रेसबरोबर केलेल्या युतीमुळे मुंबईतील जनता चिडलेली आहे. मराठी माणून दुखी आहे. उद्धव ठाकरेंनी मतासाठी रंग बदलले. त्यामुळे त्यांनी आता महाराष्ट्राच्या विकासासाठी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.