मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वांद्रे (पश्चिम) येथील खुरशेदजी बेहरामजी भाभा सर्वसाधारण रुग्णालयाच्या नवीन विस्तारित इमारतीचे लोकार्पण माहिती तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित वैद्यकीय उपचार सहज उपलब्ध होतील. यापूर्वी, विविध उपचारांसाठी रुग्णांना इतर रुग्णालयांमध्ये संदर्भित केले जात असे. मात्र, आता सुपरस्पेशालिटी सुविधांनी युक्त आरोग्यसेवा के.बी. भाभा रुग्णालयातच उपलब्ध होणार असल्याने ही आवश्यकता राहणार नाही, असे पालकमंत्री आशिष शेलार यांनी सांगितले.

या लोकार्पण सोहळ्याला उपायुक्त (सार्वजनिक आरोग्य) संजय कुऱहाडे, उपायुक्त विश्वास मोटे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक (उपनगरीय रुग्णालये) चंद्रकांत पवार, एच-पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विनायक विसपुते यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री आशिष शेलार पुढे म्हणाले, “वांद्रे परिसरात पंचतारांकित रुग्णालये असली तरी सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱया दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे महत्त्वाचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका याच उद्देशाने हे कार्य करत आहे. भाभा रुग्णालयात उपचार घेणाऱया नागरिकांसाठी न्युरोलॉजी, न्युरोसर्जरी, कार्डिओलॉजी, कॅथलॅब, डायलिसिस सेंटर आणि अत्याधुनिक उपचार विभाग अशा अनेक सेवा उपलब्ध आहेत. तसेच सीटी स्कॅन, एमआरआय यांसारख्या सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. तसेच, रुग्णालयातील स्वच्छता राखणे ही प्रशासनाइतकीच नागरिक म्हणून आपली देखील जबाबदारी आहे, असेही शेलार यांनी नमूद केले.

के. बी. भाभा रुग्णालयाच्या भौगोलिक स्थानामुळे वांद्रे (पूर्व आणि पश्चिम), खार (पूर्व आणि पश्चिम), सांताक्रूझ (पूर्व), कुर्ला (पश्चिम) या भागातील रुग्णांना मोठा लाभ होणार आहे. अंदाजे आठ लाख लोकसंख्येला या रुग्णालयाच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा दिली जाते. दररोज अडीच हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात तपासणी केली जाते. पश्चिम उपनगरातील नागरिकांना जलद आणि उत्तम सेवा देण्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या इमारतीत अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रुग्णालयाच्या विस्ताराचा पहिला टप्पा १२ मजली विस्तारित इमारतीसह पूर्ण झाला आहे. ही इमारत नागरी आरोग्य सेवांसाठी समर्पित करण्यात आली आहे. दुसऱया टप्प्यात मूळ इमारतीची डागडुजी आणि देखभाल-दुरुस्ती केली जाणार आहे. दोन्ही इमारतींमध्ये मिळून ४९७ रुग्णशय्या उपलब्ध आहेत, ज्यामध्ये अतिदक्षता (आयसीयू) आणि विविध विभागांचे विशेष कक्ष यांचा समावेश आहे. तसेच, अत्याधुनिक मॉड्युलर तंत्रज्ञानावर आधारित १४ शस्त्रक्रिया विभाग आगामी काळात संपूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे.