मुंबई :दीड लाख गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईतच घरे देण्याच्या मागणीवर ‘गिरणी कामगार एकजूट’ ठाम असून या मागणीसाठी रविवारी एकजूटने मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या कार्यालयावर मोर्चा नेला होता. या मोर्चाच्या अनुषंगाने आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरणी कामगार संघटनांची संयुक्त बैठक आयोजित करून मागण्यांवर चर्चा करण्याचे लेखी आश्वासन गिरणी कामगार ‘एकजूट’ला दिले आहे. मुंबईतच घरे द्यावीत या मागणीसाठी आता ‘एकजूट’ने थेट मुख्यमंत्र्यांनाच साकडे घालण्याचा निर्णय घेतला आहे.
पावणे दोन लाख गिरणी कामगारांपैकी केवळ २५ हजार गिरणी कामगारांनाच म्हाडाच्या माध्यमातून मुंबईत घरे देणे राज्य सरकारला शक्य झाले आहे. आता उर्वरित दीड लाख गिरणी कामगारांच्या घरांसाठी मुंबईत जागाच नसल्याने सरकारने मुंबई महानगर प्रदेशात गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शेलू आणि वांगणी येथे ८१ हजार घरे बांधण्याची कार्यवाही सुरू केली आहे. मात्र ‘गिरणी कामगार एकजूट’च्या माध्यमातून मोठ्या संख्येने गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांनी ही ८१ हजार घरे नाकारली आहेत. मुंबईतच घरे द्यावीत आणि ८१ हजार घरांसंबंधीचा १५ मार्च २०२४ रोजीचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, अशी मागणी उचलून धरली आहे.
या मागणीसाठी एकजूटकडून सातत्याने आंदोलन केले जात आहे. मात्र सरकारकडून या मागणीकडे काणाडोळा केला जात आहे. त्यामुळे ‘एकजूट’ने आंदोलन तीव्र करीत थेट शेलार यांच्या कार्यालयावरच रविवार, २७ एप्रिल रोजी मोर्चा नेला. दरम्यान मोर्चाच्या एक-दोन दिवस आधी उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतच गिरणी कामगारांना घरे देता येतील का यादृष्टीने चाचपणी करण्याचे आदेश म्हाडाला दिले.मात्र यावेळी कोणताही ठोस निर्णय घेण्यात न आल्याने ‘एकजूटी’ने रविवारी शेलार यांच्या कार्यालयावर मोर्चा काढला.
या मोर्चाची दखल घेत शेलार यांनी गिरणी कामगार, गृहनिर्माण विभाग, म्हाडा आणि गिरणी कामगार संघटना यांची एकत्रित मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक आयोजित करण्याचे लेखी आश्वासन दिल्याची माहिती ‘एकजूटी’चे पदाधिकारी संतोष मोरे यांनी दिली. या संयुक्त बैठकीत १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय रद्द करण्यासह सर्व कामगारांना मुंबईतच घरे देण्याची मागणी प्राधान्याने करण्यात येणार असल्याचेही मोरे यांनी स्पष्ट केले.