मुंबई : महायुतीचे सरकार विकासकामांना गती देणारे आणि करदात्या मुंबईकरांना न्याय देणारे सरकार आहे. गोखले पुलाचे काम विहित मुदतीपूर्वीच पूर्ण झालेले असतानाही अनेकजण टीका करत आहेत. अनेकजण आमच्यावर पक्ष तोडण्याचे आरोप करतात. मात्र, आम्ही तोडणारे नव्हे, जोडणारे आहोत. आम्ही मुंबईकरांना नागरी सेवेशी जोडणारे सेवेकरी असून एल्फिन्स्टन, अटल सेतू, सागरी किनारा प्रकल्प, रे रोड, कर्नाक बंदर जोडणारे आहोत, असे मत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आणि मुंबई उपनगराचे पालकमंत्री आशीष शेलार यांनी केले. टीका करणाऱ्या नकारात्मक लोकांपासून मुंबईकरांनी दूर राहायला हवे असेही त्यांनी नमूद केले.
अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या, गोपाळकृष्ण गोखले लोहमार्ग उड्डाणपूलाचे लोकार्पण आशीष शेलार यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. ३ जुलै २०१८ रोजी गोखले पुलाचा काही भाग कोसळला. त्यानंतर तत्कालीन सरकारने पुलाच्या बांधकामासाठी निविदा काढण्यातच २० महिन्यांचा कालावधी घालवला, तर महायुती सरकारच्या कालावधीत केवळ २८ महिन्यातच पुलाचे बांधकाम पूर्ण झाले, असे सांगत शेलार यांनी विरोधकांवर निशाणा साधला. दरम्यान, गोपाळ कृष्ण गोखले पूल नव्याने बांधून विक्रमी वेळेत पूर्णत्वास आला आहे. अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक स्थितीला सामोरे जात पूर्णत्वास आलेला हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकीचा अद्वितीय नमुना ठरला आहे, असेही शेलार म्हणाले. महानगरपालिकेचे अभियंते, कामगार आणि स्थापत्य तज्ज्ञ यांच्या अथक परिश्रमातून हा पूल अत्यंत आधुनिक पद्धतीने बांधण्यात आला आहे. या प्रकल्पासाठी वापरण्यात आलेले तंत्रज्ञान, अॅन्टी-कोरोजन स्टील आणि कंपन शोषण करणारे विशेष जॉइंट्स ही या अभियांत्रिकी तंत्रज्ञानाची महत्त्वाची वैशिष्ट्ये ठरली आहेत. संपूर्ण बांधकाम कालावधीत रेल्वे वाहतूक विनाव्यत्यय सुरु होती. या नवीन पुलामुळे वाहतूक कोंडी कमी होईल, असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.
महानगरपालिकेच्या पूल विभागाने पावसाळ्यापूर्वी तीन उड्डाणपूल खुले करण्याचे नियोजन केले आहे. त्यापैकी गोखले पूल पूर्ण क्षमतेने खुला करण्यात आला आहे. ३१ मेपर्यंत विक्रोळी पूल आणि १० जूनपर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. पूल विभाग गुणवत्ता आणि गती यांवर लक्ष केंद्रित करून कामकाज करत आहे, अशी माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी िदली.
अंधेरी येथे उषा नाला आणि विल्सन टॉकीज यांना जोडणारा उड्डाणपूल नव्याने बांधण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वेक्षण करावे. मढ – मार्वे पुलाचे कामदेखील हाती घ्यावे, अशी सूचना खासदार रवींद्र वायकर यांनी केली. महानगरपालिका आणि रेल्वे यांच्यातील समन्वयामुळे पूल २८ महिन्यांत पूर्ण झाला आहे, असे आमदार अमीत साटम यांनी सांगितले.