फडणवीस यांच्या कारकीर्दीत चौथे महाधिवक्ता नेमण्याची वेळ
राज्याचे नवे महाधिवक्ता म्हणून ज्येष्ठ वकील आशुतोष कुंभकोणी यांची नियुक्ती करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी घेतला असून तशी शिफारस राज्यपालांना करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. रोहित देव यांची उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्याने नवीन महाधिवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अडीच वर्षांच्या कालावधीत चार महाधिवक्ता नेमले गेले.
फडणवीस यांचे सरकार सत्तेवर आल्यावर नागपूर येथील ज्येष्ठ वकील सुनील मनोहर यांची नियुक्ती या पदावर झाली. त्यांनी काही महिन्यांतच वैयक्तिक कारणांसाठी राजीनामा दिल्यावर नागपूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ श्रीहरी अणे यांची नियुक्ती झाली. त्यांनी स्वतंत्र विदर्भाबाबत केलेल्या वक्तव्यांमुळे ते वादग्रस्त ठरले आणि त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पुन्हा नागपूर येथील ज्येष्ठ वकील रोहित देव यांची नियुक्ती झाली होती. त्यांची उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यावर आता कुंभकोणी यांची यापदी नियुक्ती झाली आहे.
कुंभकोणी हे गेली ३५ वर्षे वकिली व्यवसायात असून त्यापैकी १० वर्षे त्यांनी सोलापूर जिल्ह्य़ात काम केले. ते गेली २५ वर्षे उच्च न्यायालयात वकिली करीत असून राज्यघटना, महसूल, सहकार, शिक्षण, करविषयक तंटे, लवाद, जनहित याचिका, भाडेकरू कायदा अशा विविध कायद्याअंतर्गत व क्षेत्रातील अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी बाजू मांडली आहे. ते गेली काही वर्षे राज्य सरकारच्या महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये विशेष ज्येष्ठ वकील म्हणून काम पाहात आहेत.
मुंबई विद्यापीठासह अनेक विद्यापीठे, राज्यातील महापालिका व अन्य अनेक महत्त्वाच्या संस्थांची बाजू त्यांनी अनेक प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयात मांडली आहे. उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायमूर्तीपदी नियुक्ती झाल्यावर काही काळाने त्यांनी राजीनामा दिला होता. ते काही वर्षे सहमहाधिवक्ताही होते.