मुंबई : लोकसभा निवडणूक मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर निकालाची उत्कंठा असतानाच राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. महाराष्ट्रात विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार असून हरियाणाची मुदत ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणुका होण्याची शक्यता असल्याने दिवाळीपूर्वी, ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची चिन्हे आहेत.

विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक असते. यानुसार हरियाणा विधानसभा उशिरात उशिरा ४ नोव्हेंबरला अस्तित्वात येणे आवश्यक आहे. महाराष्ट्र आणि हरियाणाची विधानसभा निवडणूक २००९ पासून एकाच वेळी होत आहे. दोन्ही विधानसभांची मुदत २३ दिवसांच्या अंतराने संपत असल्यामुळे नियमानुसार एकत्र निवडणूक घेणे आवश्यक आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या काळात निवडणुका घेतल्या जात नाहीत. वास्तविक दिवाळीनंतर राज्यात विधानसभेची निवडणूक घेण्यास बराच कालावधी मिळतो. मात्र हरियाणामुळे महाराष्ट्रातही आधी निवडणूक घ्यावी लागणार आहे. २०१९ मध्ये महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये २१ ऑक्टोबरला मतदान झाले होते. यंदाही याच तारखेच्या आसपास, २१ ते २६ ऑक्टोबरच्या आठवड्यात मतदान होऊ शकेल.

हेही वाचा >>>Ghatkopar Hoarding Case: मुख्य आरोपी भावेश भिंडेला न्यायालयाचा दणका, पोलीस कोठडीत २९ मे पर्यंत वाढ

अरुणाचल, सिक्कीमचा तिढा

सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीबरोबरच अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभेची निवडणूक पार पडली. लोकसभा निवडणुकीबरोबरच चार राज्यांच्या विधानसभेची मतमोजणी ४ जूनला होणार होती. मात्र अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांची विधानसभेची मुदत २ जूनला संपत असल्याने या दोन्ही राज्यांमध्ये मतमोजणी २ तारखेला होईल. मतमोजणी पूर्ण होताच त्याच दिवशी सायंकाळी निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करावी लागणार आहेत.