लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागांत थंडीची चाहूल लागली आहे. रविवारी आणि सोमवारी मुंबईसह ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगड आदी भागांतील किमान तापमानात घसरण झाल्यामुळे पहाटे वातावरणात गारवा जाणवू लागला.
गेले अनेक दिवस मुंबई शहर, उपनगरांत ऑक्टोबरमधील उकाड्याचा प्रभाव होता. गरम हवा, आर्द्रतेमुळे होणाऱ्या काहिलीने नागरिक त्रस्त होते. मात्र, आता मुंबईतील किमान तापमानात घट झाल्यामुळे पहाटे वातावरणात गारवा जाणवू लागला. काही ठिकाणी पहाटे धुकेही पडत आहे.
राज्यातही हीच स्थिती असून, अनेक ठिकाणी किमान तापमान २०, तर कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअसच्या खाली आहे. सोमवारी धुळे, निफाड, जळगावसह परभणीत तापमानाचा पारा १० अंशाखाली गेला होता.
