मुंबई : ॲन्टॉप हिल परिसरात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसावर शुक्रवारी २७ वर्षीय तरूणाने सुऱ्याने हल्ला केला. या हल्ल्यात पोलीस शिपायाच्या हाताला सुरा लागल्यामुळे जखम झाली. आरोपीची ओळख पटली असून त्याच्याविरोधात ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार समाधान माने (३७) पोलीस शिपाई असून ते ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. पोलीस ठाण्याने हद्दपार केलेले सराईत आरोपी आपल्या परिसरात आल्याची पडताळणी करण्याचे काम माने यांना देण्यात आले होते. त्यासाठी ते बंगालीपुरा परिसरात गस्त घातल होते. त्यावेळी माने यांच्यासमोर अचानक मोहम्मद पीर मोहम्मद पठाण आला. तो माने यांना कामापासून परावृत्त करू लागला. त्याच्या हातात सुरा होता. त्यांनी आरोपीला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु आरोपी त्यांना शिवीगाळ करून लागला. त्यानंतर आरोपीने हातातील सुऱ्याने माने यांच्यावर हल्ला केला. त्याने सुरा माने यांच्या पोटात मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे माने यांनी स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या हाताला सुरा लागला. त्यामुळे रक्त येऊ लागले.

हा प्रकार पाहिल्यानंतर स्थानिक रहिवासी माने यांच्या मदतीसाठी धावले. त्यावेळी आरोपीने त्यांनाही सुरा दाखवून मदत करण्यापासून परावृत्त केले. माने यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. पण आरोपीने त्यांना धक्का देऊन पलायन केले.

आरोपी मोहम्मद पीर मोहम्मद पठाण याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने यांना शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालायत नेण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, आरोपीची ओळख पटली असून तो अमली पदार्थ सेवन करीत असल्याचा संशय आहे. आरोपीचा शोध घेण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.