महात्मा गांधी हे जुन्या भारताचे, तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत, असं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केलं होते. त्यांच्या विधानावरून नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता? अशी खोचक टीका संजय राऊत यांनी ‘सामना’तील ‘रोखठोक’ या सदरातून भाजपावर केली होती. दरम्यान, राऊतांच्या या टीकेला आता भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा – “भाजपाचे अनेक महाभाग आज उघडपणे…”; अमृता फडणवीसांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानानंतर संजय राऊतांची टीका

काय म्हणाले अतुल भातखळकर?

“आम्हाला प्रश्न विचारल्यापेक्षा संजय राऊतांनी कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, हे आधी सांगावं. त्यांचे चालक पालक, ज्यांच्याकडे ते नोकरी करतात, त्या उद्धव ठाकरेंनी कोणत्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता, हे सांगावं, मग आमच्यावर टीका करावी, असं प्रत्युत्तर अतुल भातखळकर यांनी दिले आहे. संजय राऊतांनी फालतू आणि वायफळ बोलणं बंद करावं, अन्यथा पूर्वीचे दिवस येतील, हे त्यांनी लक्षात ठेवावं”, असा इशाराही त्यांनी संजय राऊतांना दिला आहे.

हेही वाचा – मंत्रालयाची सुरक्षा ऐरणीवर; मंत्र्यांच्या वाहनासाठी दिलेल्या प्रवेशिकेचा वापर करून भलतेच वाहन मंत्रालयात दाखल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’च्या ‘रोखठोक’ या सदरातून भाजपावर जोरदार टीका केली होती. “स्वातंत्र्यलढ्याशी कोणताही संबंध नसलेली पिढी आज देशावर राज्य करत आहे. जुना इतिहास पुसून त्यांना स्वातंत्र्यलढ्याचा नवा इतिहास लिहायचा आहे. हे असे करणे म्हणजे इतिहासाशी बेइमानी ठरेल. त्या नवा इतिहास रचण्याचा पूर्ण अधिकार आहे, पण जुना पुसून त्यावर आपले नाव कोरणे सर्वस्वी चूक आहे”, असे ते म्हणाले होते. तसेच “खरगे यांचे कुत्र्यासंबंधीचे विधान भाजपाला त्यासाठीच झोंबले आहे. स्वातंत्र्यलढ्यात तुमचे कुत्रेही मेले नाही. तुम्ही आमच्या बलिदानावर काय बोलणार? असा जळजळीत प्रश्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भाजपला विचारला होता. हा प्रश्न त्यांना अस्वस्थ करत आहे. तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी हे नव्या भारताचे राष्ट्रपिता असल्याचे अमृता फडणवीस यांनी जाहीर केले, मग नव्या राष्ट्रपित्यांनी कोणत्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता?” अशी खोचक टीकाही राऊत यांनी भाजपावर केली होती.