मुंबई : अभिनेता आणि खासदार सनी देओलच्या जुहू येथील बंगल्याचा लिलाव जाहिरात प्रसिद्ध होताच अवघ्या २४ तासांत रद्द करण्यात आला आहे. बँक ऑफ बडोदाने ५६ कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी रविवारी सनी व्हिला बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे लिलाव रद्द करण्यात आल्याचे सोमवारी वृत्तपत्रात जाहिरात प्रसिद्ध करून बँकेने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर सनी देओल थकीत रक्कम भरणार असल्याने लिलाव रद्द केल्याचेही बँकेकडून सांगण्यात आले आहे.

सनी देओलचा गदर २ चित्रपट चांगली कमाई करत आहे. त्यातच रविवारी बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या जुहू येथील सनी व्हिला बंगल्याच्या लिलावासाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार सनी देओलने घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्याने त्याच्या या बंगल्याचा लिलाव करण्यात येणार होता. त्याने बँक ऑफ बडोदाकडून कर्ज घेतले, मात्र त्या कर्जाची परतफेड केली नाही. त्यामुळे त्याच्यावर ५६ कोटी रुपयांची थकबाकी होती. त्याच्या वसुलीसाठी २५ सप्टेंबरला सनी व्हिलाचा लिलाव करण्यात येणार होता. यासाठी ५१ कोटी ४३ लाख रुपयांची बोली लावण्यात आली होती. मात्र सोमवारी बँकेकडून एक शुद्धिपत्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. या शुद्धिपत्रानुसार हा लिलाव तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला आहे. 

 थकबाकी भरणार

जुहूतील सनी व्हिलाचा लिलाव अचानक रद्द केल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत असतानाच आता बँक ऑफ बडोदाने एक प्रसिद्धिपत्रक काढले आहे. त्यानुसार तांत्रिक कारणामुळे लिलाव रद्द केल्याचे स्पष्ट केले असतानाच कर्जदाराने अर्थात सनी देओलने कर्जाची, थकबाकीची परतफेड करण्यासाठी संपर्क साधला असल्याचे नमूद केले आहे. सनी देओल थकीत रक्कम भरणार असल्याने लिलाव रद्द केल्याचे म्हटले जात आहे. त्याच वेळी थकबाकीतील किती रक्कम वसूल करायची आहे हे स्पष्ट नाही. तर अन्यही काही तांत्रिक कारणेही नमूद केली आहेत.

काँग्रेसची टीका

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी समाजमाध्यमावर याबाबत टीका केली आहे.  काल दुपारी (रविवारी) लोकांना असे समजले की बँक ऑफ बडोदा खासदार सनी देओल यांच्या जुहू येथील घराचा ई-लिलाव करणार आहे. आज सकाळी (सोमवारी) २४ तासांच्या आत, तांत्रिक कारण देऊन लिलावाची नोटीस मागे घेतली. हे तांत्रिक कारण कुठून आले असा सवाल त्यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संसदेतील कामकाजात सहभाग नगण्यच

नवी दिल्ली : पंजाबच्या गुरुदासपूरचा भाजप खासदार असलेल्या सनी देओलची लोकसभेतील उपस्थिती अत्यल्प आहे. चर्चेतील सहभागही नगण्य आहे. त्याने केवळ एक प्रश्न लोकसभेत उपस्थित केला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पंजाबमधील काँग्रेसचे तत्कालीन नेते सुनील जाखड यांच्याविरोधात सनी देओल याची उमेदवारी धक्कादायक मानली जात होती. मात्र त्याने विजय मिळवला होता. विशेष म्हणजे जाखड आता भाजपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष आहेत.