मुंबई: चेंबूरमधील सिंधी सोसायटी परिसरात शुक्रवारी रात्री भरधाव वेगात आलेल्या एका ओडी मोटारगाडीने चार ते पाच वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

दोन वर्षांपूर्वी चेंबूरमधील सिंधी सोसायटी परिसरात झामा चौक – सुमननगर दरम्यान नवीन रस्ता तयार करण्यात आला आहे. मात्र अद्यापही हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे या रस्त्यालगत सध्या मोठ्या प्रमाणात वाहने उभी करण्यात येत आहेत. अनेक वाहनचालक या मोकळ्या रस्त्यावर भरधाव वेगाने वाहने चालवतात. एक महिला शुक्रवारी रात्री या रस्त्यावरून भरधाव वेगात ऑडी मोटारगाडी घेऊन जात होती. अचानक तिच्या वाहनासमोर एक श्वान आला. त्यामुळे या महिलेचा वाहनावरील ताबा सुटला. त्यानंतर या मोटारगाडीने रस्त्यालगत उभ्या असलेल्या चार ते पाच वाहनांना धडक दिली.

सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाली नाही. मात्र वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच चुनाभट्टी पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी महिला चालकाला ताब्यात घेतले असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.