मुंबई : सध्या मराठी चित्रपटसृष्टीत बहुसंख्य चित्रपटांची निर्मिती होत आहे. विविध कार्यक्रमांसह समाजमाध्यमांच्या माध्यमातून प्रसिद्धी करण्यावर भर दिला जात आहे. मात्र प्रसिद्धीची सर्व तंत्रे वापरूनही काही चित्रपटांना अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. परंतु जी गोष्ट रस्त्यावर गाजते, त्याचा प्रभाव अधिक पडतो, हेच जाणून पथनाट्याच्या माध्यमातून ‘अवकारीका’ या आगामी मराठी चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात येत आहे.

आयुष्याच्या प्रवासात स्वतःच्या जगण्याचा रस्ता शोधण्यासाठी अनेकजण अहोरात्र मेहनत करीत असतात. तसेच अनेकजण सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी कसून काम करीत असतात. समाजाला त्यांच्या श्रमाची जाणीव व्हावी, स्वच्छतेसंदर्भात प्रभावीपणे जागरूकता निर्माण व्हावी याच संकल्पनेतून आणि भावनेतून ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. रेडबड मोशन पिक्चर या बॅनरअंतर्गत येत्या १ ऑगस्टला भेटीला येणाऱ्या ‘अवकारीका’ चित्रपटाचे दिग्दर्शन सीए. अरविंद भोसले यांचे आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा बुधवार, १६ जुलै रोजी मुंबईत पार पडला. यावेळी चित्रपटातील कलाकार व तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती. आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी स्वच्छतेचे महत्व पटवून देणाऱ्या आणि ‘अवकारीका’ चित्रपटासंदर्भात माहिती देणाऱ्या पथनाट्याचेही सादरीकरण करण्यात आले.

शारदाई क्रिएशन निर्मित सदर पथनाट्याचे लेखन – दिग्दर्शन अभिजीत पवार यांनी केले आहे. या चित्रपटात भारुड व विविध गाण्यांचाही समावेश करण्यात आला आहे. दररोज १० ते १५ वेळा शहरातील मुख्य रस्ते व चौकात पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येत असून आतापर्यंत ८० ते ८५ ठिकाणी पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. मुंबई, पुणे, पिंपरी – चिंचवड, सातारा, सांगली, कोल्हापूर आदी विविध शहरात १ ऑगस्टपर्यंत पथनाट्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.

‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती भारत टिळेकर, अरुण जाधव यांनी केली असून सहनिर्मिती मनोज गायकवाड, अरविंद भोसले, मृणाल कानडे, गीता सिंग यांची आहे. तर अभिनेता विराट मडके ‘अवकारीका’ चित्रपटात स्वच्छता दूताच्या भूमिकेत असून त्याच्यासोबत या चित्रपटात राहुल फलटणकर, रोहित पवार आदी कलाकार मंडळी आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, संवाद, गीते अरविंद भोसले यांची आहेत. तर श्रेयस देशपांडे यांचे संगीत असून गायक कैलाश खैर, सुनिधी चौहान, ज्ञानेश्वर मेश्राम यांचे स्वर चित्रपटातील गीतांना लाभले आहेत.

‘एखादा विषय परिपूर्ण पद्धतीने मांडण्यासाठी चित्रपट हे सशक्त माध्यम आहे. महाराष्ट्रासारख्या छत्रपती शिवाजी महाराज आणि संतांच्या भूमीतून आदर्श विचारांचीच पेरणी होत असते. त्यामुळे स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी आणि सफाई कामगारांच्या तळमळ मांडण्यासह त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती केली. हा चित्रपट वर्तमान आणि भविष्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे’, असे दिग्दर्शक सीए. अरविंद भोसले यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश नेमके काय म्हणाले?

सद्यस्थितीत समाजाचे प्रतिबिंब कुठेही दाखविले जात नाही आणि ज्या ठिकाणी प्रतिबिंब दाखविले जाते, त्या ठिकाणी बघण्यासाठी लोक जात नाहीत. देशातील सामाजिक समस्यांसंदर्भात लोकांना जागृत करणे हे प्रत्येक साहित्यिक, कलाकार व तंत्रज्ञांचे आद्य कर्तव्य आहे. हे कर्तव्य ‘अवकारीका’ चित्रपटाच्या माध्यमातून पार पाडण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. आपल्या सभोवतालचा कचरा घेऊन जाणाऱ्या व्यक्तींचे समाजासाठीचे योगदान हे लोकांना समजणे ही काळाची गरज आहे. या सर्व श्रमिकांचा सन्मान करणे गरजेचे असून त्यांच्याकडे माणुसकीच्या नजरेतून पाहणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केले. तसेच एक प्रामाणिक उद्देश ठेऊन आणि स्वच्छतेसारखा एक महत्वाचा विषय घेऊन ‘अवकारीका’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली, याबद्दल संपूर्ण चमूचे मनापासून कौतुक आहे, असेही त्यांनी सांगितले.