मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावरून दोन महिन्यांत पावणेनऊ लाखांहून अधिक वाहनांनी प्रवास केला आहे. तर लोकार्पणापासून आतापर्यंत टोलवसुलीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीत ६२ कोटींची भर पडली आहे.

मुंबई ते नागपूर अशा ७०१ किमीच्या समृद्धी महामार्गातील नागपूर ते शिर्डी असा ५२० किमीच्या महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबर २०२२ ला नागपूर येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. लोकार्पणानंतर लगेचच यावरून वाहने धावू लागली असून समृद्धीवरून प्रवास करण्यासाठी प्रवासी/वाहनचालकांना टोल भरावा लागतो आहे. ५२० किमीच्या महामार्गावर १९ ठिकाणी टोल नाके असून ५२० किमीच्या प्रवासासाठी वाहनचालक / प्रवाशांना ९०० रुपये टोल भरावा लागतो आहे. ‘जितका प्रवास तितका टोल’ या नियमानुसार टोलवसुली करण्यात येत आहे. त्यानुसार या टप्प्यात १९ छेदमार्ग असून ज्या छेदमार्गावर वाहन उतरेल, तितक्या किमीसाठी टोल वसूल करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून एमएसआरडीसीला टोलच्या माध्यमातून चांगला महसूल मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोकार्पणापासून म्हणजे ११ डिसेंबर ते २० फेब्रुवारीदरम्यान समृद्धीवरून ८ लाख ७९ हजार ०५८ वाहनांनी प्रवास केला आहे. डिसेंबरमध्ये (२१ दिवस) २ लाख २० हजार ९०३ जणांनी, जानेवारीत (३१ दिवस) ४ लाख ०४ हजार ३०२ जणांनी तर फेब्रुवारीत २० फेब्रुवारीपर्यंत (२० दिवस) २ लाख ५३ हजार ८५३ वाहनांनी समृद्धीवरून प्रवास केला आहे. साडेचार ते पाच तासांत नागपूर ते शिर्डी प्रवास करता येत असल्याने समृद्धीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा एमएसआरडीएकडून केला जातो आहे. दिवसाला सरासरी १५ हजार वाहने समृद्धीवरून धावत आहेत. यातून एमएसआरडीसीला चांगला महसूल मिळत असल्याची माहिती एमएसआरडीसीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. ११ डिसेंबर २०२२ ते २० फेब्रुवारी २०२३ दरम्यान ६२ कोटी ०८ लाख ४३ हजार १०९ रुपये इतका टोल वसूल झाला आहे. डिसेंबर २०२२ मध्ये १३ कोटी २० लाख ५१ हजार ३६१ रुपये, जानेवारी २०२३ मध्ये २७ कोटी ७४ लाख ११ हजार ९६८ रुपये तर फेब्रुवारी २०२३ मध्ये (२० फेब्रुवारीपर्यंत) २१ कोटी १३ लाख ७९ हजार ७८० रुपये अशी टोलवसुली झाली आहे. दिवसाला मिळणाऱ्या टोलच्या रकमेत आता वाढ होत असून सध्या दिवसाला एक कोटी रुपयांपेक्षा अधिक टोलवसुली होत असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.