मुंबई : मुंबई येथील आयआयटी संकुलामध्ये जातीविषयक सर्वसमावेशक विचार रुजविण्याच्या उद्देशाने जातीय आणि वांशिक भेदभावाबाबत जनजागृती करणारा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम सर्व विद्यार्थ्यांना बंधनकारक असणार आहे. आयआयटी संकुलात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये जातिवाचक भेदभाव केल्यामुळे येणाऱ्या अडचणी समजून घेण्याच्या उद्देशाने संस्थेच्या अनुसूचित जाती, जमाती विभागाने काही सर्वेक्षण केले होते. जातीविषय जनजागृती करणारे उपक्रम आणि यासाठी शैक्षणिक अभ्यासक्रमाची आवश्यकता याचाही अभ्यास या सर्वेक्षणात करण्यात आला होता. संस्थेतर्फे जातीय भेदभावाबाबत खुले चर्चासत्रही आयोजित करण्यात आले होते. यामध्ये १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. जातीय आरक्षण, भेदभावावरून हिणवले जात असल्याचा अनुभव काही विद्यार्थ्यांनी यावेळी कथन केला. यामुळे आपला आत्मविश्वास खचत असल्याची खंत काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली होती.

जात आणि वांशिक भेदभावाबाबत अधिक जनजागृती करण्याची तसेच अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश करणे आवश्यक असल्याचे या सर्वेक्षणावरून निदर्शनास आले. त्यामुळे संस्थेने जातीय आणि वांशिक भेदभावाविषयी जनजागृती करणारा शैक्षणिक अभ्यास सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अभ्यासक्रम संस्थेने जाहीर केलेला नाही.

जातीवाचक भेदभावाबाबत जनजागृती केल्यास सर्वसमावेशकता वाढण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारीही कमी होतील. उदाहरणार्थ जातिवाचक किंवा वर्णद्वेषी शब्दांचा बोली भाषेमध्ये करण्यात येणाऱ्या वापराबाबत जनजागृती केल्यास अशा शब्दांचा वापर टाळता येईल आणि संस्थेतील वातावरणही सौहार्दाचे राहील, असे आयआयटीच्या अनुसूचित जाती, जमाती विभागाने दिलेल्या पत्रामध्ये नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अनुसूचित जाती-जमातीतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा उपक्रमही या विभागाने सुरू केला आहे. यामध्ये वरिष्ठ विद्यार्थी या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेतील. तसेच संकुलामध्ये जाती किंवा वर्णभेदाचे वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता घेतील असा यामागील प्रमुख उद्देश आहे.