मोकाट जनावरांचे हाल; चारा-पाणी मिळत नसल्याचा आरोप

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मालाड येथे असलेल्या पालिकेच्या कोंडवाडय़ात मोकाट जनावरांचे हाल होत असल्याचा आरोप कामगारांनी केला आहे. या ठिकाणी जनावरांना पुरेसा चारा-पाणी मिळत नसल्यामुळे तसेच प्रचंड अस्वच्छतेमुळे गुरे दगावत असल्याचा आरोप कामगार सेनेने केला आहे. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.

मुंबईच्या रस्त्यावर मोकाटपणे फिरत असलेल्या गुरांमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होते, तर कधी कचऱ्याच्या डब्याजवळ चरणाऱ्या गुरांमुळे रस्त्यावर घाण पसरते. कधी गुरे पादचाऱ्यांवर हल्ला करतात तर कधी रस्त्यावर शेण टाकत असल्यामुळेही त्रास सोसावा लागतो. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यानंतर पालिकेचे कर्मचारी अशा जनावरांना पकडून आणतात आणि मालाडच्या एव्हरशाइन नगरमध्ये असलेल्या पालिकेच्या कोंडवाडय़ात ठेवतात. या जनावरांच्या मालकांना पालिकेच्या नियमानुसार दंड भरून जनावरे सोडवून नेता येतात. मात्र या कोंडवाडय़ात जनावरांचे हाल होत असल्याचा आरोप म्युनिसिपल कामगार सेनेने केला आहे. काही दिवसांपूर्वी कोंडवाडय़ात एक गाय आणि वासरू यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोंडवाडय़ांमध्ये जनावरे सुरक्षित नसल्याचा आरोप कामगार सेनेचे बाबा कदम यांनी केला. या कोंडवाडय़ातील गटारे फुटली असून गटाराचे पाणी चाऱ्यात व पिण्याच्या पाण्यात मिसळत असल्यामुळे गुरांना आजार होत असल्याचे कदम यांचे म्हणणे आहे. तर फुटक्या गटारात पडूनही अनेक जनावरे जखमी होत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. हा विभाग देवनार पशुवधगृहांतर्गत येत असून त्याचा कार्यभार पुन्हा आरोग्य विभागाकडे द्यावा, अशी मागणी कदम यांनी पालिका आयुक्तांकडे पत्र लिहून केली आहे.

देवनार पशुवधगृहाचे महाव्यवस्थापक डॉ. योगेश शेटय़े यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले, कोंडवाडे पकडून आणलेल्या जनावरांची तात्पुरती सोय असते. या ठिकाणी जनावरांसाठी मुबलक चारा व पाणी आहे. हे जनावरांचे रुग्णालय नाही. मात्र जनावरे आजारी पडल्यास त्यांची तपासणी केली जाते. एखादे जनावर मेल्यास मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातर्फे त्यांचे शवविच्छेदन करून अहवालाच्याही नोंदी ठेवल्या जातात. परंतु ही मोकाट जनावरे असल्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या तक्रारी असतात. अनेकदा मालकांनीच त्यांना क्रूर वागणूक दिलेली असते. त्यामुळे या जनावरांची प्रकृती नाजूक असते, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

  • वर्षभरात विभागामार्फत ६८५ जनावरांवर जप्तीची कारवाई.
  • गुरे नियंत्रण कायद्यानुसार मुंबईत जनावरे ठेवता येत नाही.
  • ज्या जनावरांना सोडवण्यासाठी मालक पुढे येत नाहीत किं वा ज्यांच्या वारंवार तक्रारी येतात त्यांना पालघरच्या जीवदया संस्थेकडे दिले जाते.
  • बऱ्याचदा जनावरे वृद्ध झाली की त्यांना रस्त्यावर सोडून मालक पळून जातात.

कोंडवाडय़ाचे नूतनीकरण

हा कोंडवाडा १९८५ पासून आहे. त्याची आता दुर्दशा झाली आहे. मात्र कोंडवाडय़ाचे नूतनीकरण करण्यात येणार असून त्यासाठी पालिकेच्या वास्तुविशारदांनी आराखडा तयार केला असून त्याला इमारत प्रस्ताव विभागाची मंजुरीही मिळाली आहे. तर नगर अभियंता विभागाने त्याची निविदा प्रक्रियाही सुरू केली आहे.
– डॉ. योगेश शेटय़े, महाव्यवस्थापक, देवनार पशुवधगृह

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bad condition of animals cow dd70
First published on: 21-11-2020 at 02:28 IST