प्रस्तावात बदल करण्याची प्राधिकरणाची शिफारस
शिवाजी पार्क मैदानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे कायमस्वरुपी छोटे स्मारक उभारण्याच्या मागणीस राज्य सरकारने अनुकूलता दर्शविली आहे. या संदर्भातील प्रस्ताव राज्य शासनाच्या वतीने पर्यावरण विषयक प्राधिकरणासमोर मांडण्यात आला असून, सध्याच्या आराखडय़ात काही बदल करण्याची सूचना प्राधिकरणाने केली आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिवाजी पार्क मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. यामुळेच मैदानात शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळशिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येत होती. शिवसेनाप्रमुखांचे स्मारक म्हणून स्मृती चौथरा आणि उद्यान (लॅण्डस्केप) उभारण्याची योजना आहे. या प्रस्तावाला मान्यता मिळावी म्हणून राज्य शासनाच्या वतीने महाराष्ट्र किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मंगळवारी झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेत राज्य शासनाचा प्रस्ताव म्हणून शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाचा उल्लेख करण्यात आला होता. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे नेहमीच शिवसेनेच्या संदर्भात सौम्य भूमिका घेतात, असा आक्षेप राष्ट्रवादीच्या वतीने घेण्यात येतो. राज्य शासनाने शिवसेनाप्रमुखांच्या शिवाजी पार्क मैदानातील स्मारकाबाबत मवाळ भूमिका घेतल्याचे मात्र स्पष्ट होते.
प्राधिकरणाच्या बैठकीत राज्य शासनाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. उद्यानासाठी सादर करण्यात आलेला आराखडा प्राधिकरणाने मान्य केला नाही. या आराखडय़ात बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे. प्राधिकरणाच्या बैठकीत शिवाजी पार्क मैदानातील शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकाच्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली, पण अद्याप मान्यता देण्यात आलेली नसल्याचे पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव आर. ए. राजीव यांनी सांगितले.
दरम्यान, नवी मुंबईतील सीआरझेड बाधित प्रत्येक इमारतीचा आढावा घेण्यात येणार आहे. नियम अस्तित्वात येण्यापूर्वी आराखडा मंजूर झाल्यास या इमारतींना परवानगी मिळण्यात अडचण येणार नाही, असे समजते.