म्हाडाच्या कोकण मंडळाने २०१८ मध्ये काढलेल्या बाळकुम येथील गृहप्रकल्पातील विजेते अखेर आक्रमक झाले आहेत. मंडळाकडून घरांच्या किंमतीत करण्यात आलेली १६ लाखांची वाढ रद्द करावी या मागणीकडे सरकार आणि म्हाडा कानाडोळा करीत आहे. त्यामुळे आता विजेत्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १७ ऑक्टोबर रोजी हे विजेते आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहेत.
हेही वाचा- बीडीडी चाळ प्रकल्पाच्या वाढीव खर्चाची म्हाडाला चिंता
कोकण मंडळाच्या बाळकुम गृहप्रकल्पातील सोडतीमधील १२५ आणि २००० च्या योजनेतील ६९ लाभार्थ्यांच्या घरांच्या किमतीत १६ लाख रुपयांनी वाढ झाली आहे. बहुमजली वाहनतळ, पाणीपुरवठा, व्याज आणि मेट्रो उपकर यामुळे किंमती वाढल्या आहेत. घराची किंमत ४३ लाख ४५ हजार २३६ रुपयांवरून ५९ लाख ७४ हजार ८०० रुपयांवर पोहोचली आहे. सोडतीच्या जाहिरातीत किमती वाढतील असे नमूद करण्यात आले होते. मात्र थेट १६ लाख रुपयांनी किंमत वाढल्याने विजेत्यांनी/लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर विजेते तसेच लाभार्थ्यांनी वाढीव रक्कम रद्द करण्याची मागणी म्हाडाकडे केली आहे. मात्र, किंमती कमी करण्याचा अधिकार म्हाडाला नाही अशी सबब पुढे करीत कोकण मंडळाने ही मागणी अप्रत्यक्षपणे फेटाळून लावली आहे.
कोकण मंडळाच्या या उदासीन भूमिकेमुळे आता या विजेत्यांनी आणि लाभार्थ्यांनी नुकतीच थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या विषयाची सविस्तर माहिती त्यांना देण्यात आली. तसेच घराची किंमत कमी करण्याची मागणी करण्यात आल्याची माहिती एका विजेत्याने दिली. या प्रकरणात लक्ष घालण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांकडून ठोस आश्वासन न मिळाल्याने आता आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. १७ ऑक्टोबरला आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार आहोत, असेही या विजेत्यांने सांगितले.