Best Ganpati Decoration 2025 मुंबई : दरवर्षी प्रसिध्द मंदिरांची हुबेहुब आरास साकारणाऱ्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवानिमित्त ५२ फूट उंचीचे हुबेहुब काशी विश्वनाथ मंदिर साकारले आहे. शिवाय राज्य महोत्सवानिमित्त मंडळातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यावर्षीचे ३० वे वर्ष असून दरवर्षी एक प्रसिध्द मंदिराची आरास या मंडळातर्फे केली जाते. गतवर्षी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक मंदिर तर त्यापूर्वी उज्जेन येथील महाकाल मंदिर, केदारनाथ मंदिर, पशुपतीनाथसह महाराष्ट्रातील विठ्ठल मंदिर, शिर्डीचे साई समाधी मंदिर अशी विविध मंदिरांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. तर मंडळाच्या रौप्यमहोत्सवी वर्षात लोकामन्य बाळा गंगाधर टिळक यांच्या रत्नागिरीतील वाड्याची प्रतिकृती साकारण्यात आली होती.

विविध जाती धर्मियांची वस्ती असलेल्या रेक्लमेशन येथे हा गणेशोत्सव साजरा होत असून या उत्सवात सर्वधर्मिय सहभागी होतात आणि मोठया उत्साहात हा उत्सव साजरा करतात हेही त्याचे वैशिष्ट. तसेच दरवर्षी चित्रपट, क्रिडा, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर या मंडळाच्या गणेशमूर्तीच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. त्यामुळे मुंबईतील गणेशोत्सव मंडळामध्ये हे मंडळ लक्षवेधी ठरले आहे. मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार हे प्रमुख सल्लागार आहेत.

काय आहे यावर्षीची संकल्पना..

श्री काशी विश्वेश्वर हे बारा ज्योतिलिंगंपैकी एक आहे. हे मंदिर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे असून मंदिर गंगा नदीच्या पश्चिम तीरावर आहे. क्रूर आक्रमक तुद्दीन ऐबक याने हे काशीचे मुख्य विश्वनाथ मंदिर पाडले. या मंदिराच्या ठिकाणी मशीद उभारली ‘अनेक शतके गेल्या नंतर तेथे अहिल्याबाई होळकर यांनी विश्वनाथ मंदिर बांधले. या शहरात सुमारे १६५४ मंदिरे आहेत. त्यामुळे याला मंदिराचे शहर असेही म्हणतात. त्यात प्रमुख मंदिर काशी विश्वेश्वराचे आहे. इतर देवतांच्या लहान लहान मंदिरांनी हे मंदिर वेढले गेले आहे. उत्तर भारतातील मंदिरांप्रमाणेच काशी विश्वनाथ मंदिरही नागर शैलीत बांधण्यात आले आहेः मंदिराच्या गर्भगृहाच्या ईशान्य कोपऱ्यात काशी विश्वनाथांची मुख्य शिव पिंडी आहे, त्यावर गंगाजल व बिल्वपत्रे वाहण्यात येतात. ते काळ्या पाषाणाचे व सोन्या-चांदीने मढविले आहे.

त्याच मंदिराची हुबेहुब प्रतिकृती वांद्रे येथे साकारण्यात आली आहे. मंदिराचा कळस, वैशिष्टपूर्ण असलेले खांब, विश्वेश्वराची पिंड या सगळ्याची हुबेहुब प्रतिकृती साकरली आहे. यासोबतच या संपूर्ण परिसरात दिव्यांची रोषणाई करण्यात आली असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष जितेंद्र राऊत यांनी दिली.