प्रसिद्ध रंगकर्मी कमलाकर सोनटक्के; बापूराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांला प्रारंभ

कलेवर कोणत्याही नियमांमुळे नियंत्रण असू नये, असे मानणारी बापूराव नाईकांसारखी व्यक्तिमत्त्वे आणि मुंबई मराठी साहित्य संघासारखी संस्था खंबीरपणे नाटय़ प्रशिक्षणात पाठीशी राहिली. त्यामुळे अनेक विद्यार्थी घडले. त्यांना कलेचे चहुबाजूंनी ज्ञान घेता आले. त्यांना नेतृत्व गुण शिकवले गेले. बापूराव नाईक यांच्यासारख्या द्रष्टय़ाची ती दृष्टी होती. दिल्ली येथील राष्ट्रीय नाटय़ विद्यालयात शिकत असताना बापूराव नाईक यांनी बोलावून घेतले आणि मुंबईत नाटय़ प्रशिक्षण देण्याची जबाबदारी माझ्यावर सोपविली. बापूरावांनी मुंबई मराठी साहित्य संघात अमृत नाटय़ भारती’(अनाभा) या त्या काळी सुरू केलेल्या नाटय़ प्रशिक्षणामुळे आज आपण या क्षेत्रात अग्रेसर आहोत, असे उद्गार ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर सोनटक्के यांनी मुद्रण आणि नाटय़ क्षेत्रात अतुलनीय कार्य केलेल्या बापूराव नाईक यांच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात काढले.

बापूराव नाईक यांचा जन्म २९ फेब्रुवारी १९२० रोजी झाला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षांला यंदा सुरुवात होत आहे. त्यानित्ताने मुंबई मराठी साहित्य संघ आणि बापूराव नाईक यांच्या कुटुंबीयांनी साहित्य संघात शुक्रवारी ‘बापूराव नाईक सिनेटरी’ या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्यांचे पुत्र, ज्येष्ठ नाटय़कर्मी अरुण नाईक यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बापूरावांनी मुद्रण आणि नाटय़क्षेत्रात अतुलनीय कार्य केले, हे सांगताना अरुण नाईक म्हणाले, बापूरावांना वाचनाची आवड होती. त्यांनी विविध ठिकाणच्या छापखान्यात काम केले. काही काळ त्यांनी ज्येष्ठ नाटककार मामा वरेरकर यांच्याकडे लेखनिक म्हणूनही काम केले.

मुद्रणालय, छपाई, कागदाचा वापर या सगळ्या गोष्टींचे त्यांना उत्तम ज्ञान होते. त्यामुळे त्यांनी त्या विषयावर विपुल लेखन केले. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी कागद नावाचे पुस्तक लिहिले. त्यात कागद कसा तयार होतो आणि त्याचा वापर कसा केला जातो याचा उल्लेख आहे. हे अतिशय दुर्मीळ पुस्तक आहे. त्यानंतर त्यांनी छपाई कलेवर देवनागरी मुद्राक्षरलेखनकला, भारतीय ग्रंथमुद्रण अशी पुस्तके लिहिली. तसेच नाटय़कलेवरही लेखन केले. इंग्लंडला ते याच शिक्षणासाठी गेले असताना साहित्य संघाचे डॉ. भालेराव यांनी बापूरावांना साहित्य आणि नाटय़कलेसाठी एक वास्तू उभारण्याचा मनसुबा सांगितला. त्याप्रमाणे बापूरावांनी साहित्य संघाची इमारत कशी असावी, याबाबतचे एक आरेखन करून भालेरावांना पाठवले. त्यासाठी त्यांनी इंग्लंड आणि भारतातील काही नाटय़गृहे स्वत: पाहिली. मग आराखडा तयार केला, असे सांगत अरुण नाईक यांनी बापूराव नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग उलगडले.

मुंबई मराठी साहित्य संघाच्या उभारणीत बापूराव नाईक यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या दुर्मीळ आठवणींची ठेव फार मोलाची आहे, असे बाळ भालेराव यांनी सांगितले. बापूरावांचे जीवनचरित्र उलगडणारे पुस्तक प्रकाशित करण्यात येईल, असे त्यांनी साहित्य संघाच्या वतीने जाहीर केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या कार्यक्रमाला नाटय़ अभ्यासक आणि नाटय़रसिकांनी आवर्जून उपस्थिती लावली होती. अरुण नाईक यांच्याबरोबरच प्रसिद्ध अभिनेत्री मीना नाईक, अभिनेत्री मनवा नाईक, लेखक राजीव नाईक तसेच नाईक कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहित्य संघाच्या साहित्य दालनाच्या प्रमुख सुहासिनी कीर्तीकर यांनी केले. कार्यवाह उज्ज्वला मेहेंदळे यांनी आभार मानले.