मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत वरळीतील दोन पुनर्वसित इमारतींमधील ५५६ घरांच्या चावी वाटपाचा सोहळा गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १६ रहिवाशांना घराची चावी देण्यात आली. मात्र या १६ जणांसह उर्वरित रहिवाशांना चावीसह घराचा प्रत्यक्ष ताबा देण्यास सोमवारपासून सुरुवात होणार आहे. स्वातंत्र्य दिन आणि शनिवार-रविवारची सुट्टी लक्षात घेऊन आता मुंबई मंडळाकडून सोमवारपासून घराचा ताबा देण्याच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. गणेशोत्सव जवळ आला असून अनेकांना यंदा गणेशोत्सव आपल्या नव्या हक्काच्या घरात साजरा करायचा आहे. त्यामुळे अनेक रहिवाशांना घराचा ताबा घेण्याची घाई आहे. त्यामुळे सोमवारी ताबा घेण्याकडे अनेकांचा कल आहे. घरांचा ताबा देण्यास सुरुवात झाल्याने वरळीतील घरांचा ताबा मिळणाऱ्या रहिवाशांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. त्यामुळेच गुरुवारच्या चावी वाटप सोहळ्याला रहिवाशांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

वरळीतील इमारत क्रमांक ३०, ३१ आणि ३६ मधील ५५६ रहिवाशांना दोन पुनर्वसित इमारतींमधील घरांचा ताबा दिला जाणार आहे. कोणत्या रहिवाशाला कुठे, कोणत्या मजल्यावर घर द्यायचे याची निश्चिती सोडतीद्वारे करण्यात आली आहे. त्यानुसारच घरांचा ताबा देण्यात येणार आहे. सोमवारपासून ताबा देण्यास सुरुवात होणार आहे. पण प्रत्यक्ष घराचा ताबा घेण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळाने सध्या म्हाडाच्या संक्रमण शिबिरात रहात असलेल्या रहिवाशांना हमी पत्र बंधनकारक केले आहे. अधिकाधिक रहिवासी संक्रमण शिबिरात वास्तव्यास आहेत. त्यामुळे त्यांना आता ५०० रुपयांच्या बाँड पेपरवर आपणास पुनर्वसित इमारतीतील घराची चावी मिळाली असून आता मी संक्रमण शिबिरातील गाळ्याचा हक्क सोडत आहे अशा स्वरुपाचे हमी पत्र द्यावे लागणार आहे. हे हमी पत्र देऊन ताबा घेण्यास वेळ लागणार असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांना गणेशोत्सव नव्या घरात साजरा करायचा आहे. गणेशोत्सवासाठी खूपच कमी दिवस राहिल्याने घराचा ताबा वेळेत मिळेल आणि गणेशोत्सव नव्या घरात साजरा करता येईल का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.दरम्यान, हमी पत्र घेऊन शक्य तितक्या लवकर रहिवाशांना घराचा ताबा देण्य

…तेव्हा अनेकांनी धमक्या दिल्या, शिव्या घातल्या

वरळीत बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत घरे रिकामी करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मोठ्या संख्येने रहिवाशांनी घरे रिकामी करण्यास विरोध केला. कुणीही घर रिकामे करण्यास तयार नव्हते. घरे रिकामे केले आणि नंतर हक्काचे घर मिळालेच नाही तर काय, अशी भीती सगळ्यांनाच वाटत होती. पण मला मात्र म्हाडावर विश्वास होता. त्यामुळे वरळीत सर्वात आधी पहिले घर मी रिकामे केले. तेव्हा अनेकांनी धमक्या दिल्या, शिव्या घातल्या, हिला झोपडीही मिळणार नाही असे हिणवले. पण मी घर रिकामे केल्यानंतर हळूहळू एक एक करत रहिवाशी घरे रिकामी करू लागले. काही दिवसातच इमारती रिकाम्या झाल्या, इमारती पाडल्या गेल्या, त्या जागी नवीन इमारती उभ्या राहू लागल्या आणि आज मला माझे ५०० चौरस फुटांच्या हक्काच्या घराची चावी मिळाली. त्यामुळे आज मी खूप आनंदी आहे. लवकरात लवकर नव्या घराचा ताबा घेणार असून यंदाचा गणेशोत्सव नव्या घरातच साजरा करणार. – कृष्णाबाई काळे, रहिवासी

आनंद आहेच, पण…

माझे सासू-सासरे सर्वप्रथम वरळीतील चाळ क्रमांक ११ मधील खोली क्रमांक ३८ मध्ये राहण्यास आले. त्यानंतर हळूहळू आमचे नातेवाईक, इतर लोक येथे राहायला आले. मी लग्नानंतर येथे आले. माझ्या मुलांचा, नातवंडांचा जन्म याच घरात झाला. आमच्या चार पिढ्या या घरात वाढल्या. बीडीडी चाळीचा पुनर्विकास होणार असे आम्ही १९९५ पासून ऐकत होतो. त्यामुळे माझे पती पुनर्विकासाची आस धरून होते. नव्या घरात वास्तव्यास जाण्याचे स्वप्न पाहत होते. पण पुनर्विकास सुरू होण्याआधीच, २०१४ मध्ये त्यांचे निधन झाले. पुनर्वसित इमारतीतील हक्काच्या घराची चावी आज मिळत असल्याने आनंद होत आहे, पण हे घर पाहण्यासाठी माझे पती नाहीत याचे दुखही होत आहे. – स्मिता शेट्ये, रहिवाशी

घर विकणार नाही

आम्ही मूळ गुजरातचे, पण माझे आजोबा मुंबईत आले. माझ्या वडीलांचा, माझा जन्म मुंबईतच झाला. बीडीडी चाळीतील १६० चौरस फुटांच्या घरात आम्ही अनेक वर्षे राहिलो. मोठे घर मिळावे असे आमचे स्वप्न होते आणि आज ते पूर्ण झाले याचा आनंद आहे. हक्काचे ५०० चौरस फुटांचे घर मिळाले असून हे घर आम्ही कधीच सोडणार नाही, विकणार नाही. – गणेश राजपूत, रहिवासी