मुंबई : दादर परिसरात शनिवारी रात्री प्लाझा येथील बस थांब्याजवळ बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक पादचारी ठार झाला असून, एका महिलेसह चार प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनास्थळी पोलीस, बेस्ट उपक्रमातील अधिकारी व इतर अत्यावश्यक पथक पोहचले. त्यानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.

बेस्ट उपक्रमातील मातेश्वरी कंपनीची बस शनिवारी रात्री बेस्ट मार्ग क्रमांक १६९ वर धावत होती. ही बस वरळी आगारावरून प्रतीक्षानगर आगाराकडे जात होती. रात्री ११.३० च्या सुमारास बस प्लाझा बस थांब्याजवळ येत असताना दादर टीटीकडून शिवाजी पार्कच्या दिशेने भरधाव वेगात जाणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हलरच्या चालकाचे नियंत्रण सुटले. या टेम्पोने थेट बसला पुढील बाजूच्या उजव्या चाकाला जोरदार धडक दिली. जोरदार धडक बसताच बेस्ट बस डावीकडे वळली. बस थांब्यावर उभ्या प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना चिरडत बस पुढे गेली.

या अपघातात बसचे पुढील चाक तुटले, समोरील काचही तुटल्या. बेस्ट बसला धडकल्यानंतर टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्यावर उभ्या असलेली एक टॅक्सी आणि एका खासगी मोटारीही धडक दिली. यात दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले. या अपघातात पादचारी शहाबुद्दीन (३७) जागीच ठार झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने शीव रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी शहाबुद्दीन यांना मृत घोषित केले. याव्यतिरिक्त अन्य चार जण या अपघातात जखमी झाले. राहुल अशोक पडाले (३०), रोहित अशोक पडाले (३३), अक्षय अशोक पडाले (२५) आणि विद्या राहुल मोते (२८) अशी या चौघांची नावे आहेत.

सध्या जखमींवर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच शिवाजी पार्क पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालकाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी बस सोडली आणि बस आरटीओ चाचणीसाठी वडाळा आगारात नेण्यात आली, अशी माहिती बेस्ट उपक्रमाद्वारे देण्यात आली.