मुंबई : बेस्ट बस चालकाने बस मागे न घेतल्याने एका रिक्षा चालकाने त्याच्या दोन साथीदारांच्या मदतीने बेस्ट बस चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी कांजूरमार्ग परिसरात घडली आहे. याबाबत कांजूरमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
बाळासाहेब शिंदे (५४) असे यातील जखमी बेस्ट बस चालकाचे नाव असून ते कांजूरमार्ग बेस्ट डेपो येथे हंगामी वाहक म्हणून कार्यरत आहेत. सोमवारी सकाळी कांजूरमार्ग बस डेपो बाहेर त्यांनी एक बस उभी केली होती. त्याचवेळी बसच्या बाजूला एका रिक्षा चालकानेही रिक्षा उभी केली. मात्र त्याचवेळी बसच्या बाजूलाच एका टेम्पो चालकाने टेम्पो उभा केल्याने रिक्षा चालकाला रिक्षा काढता येत नव्हती. त्यावरून बेस्ट बस चालक आणि रिक्षा चालकामध्ये वाद सुरू झाला. यावेळी रिक्षा चालक आणि त्याच्या दोन साथीदारांनी बेस्टच्या चालकाला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. त्यात बेस्ट बस चालकाच्या तोंडाला जबर दुखापत झाली आहे.
बेस्ट बस चालक शिंदे यांनी तात्काळ याबाबत पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी मारहाण करणाऱ्या दिनेश घेवडे (१९), कौस्तुभ भाटकर (२५) आणि बाबू (२५) या तिघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.