मुंबई : बेस्ट उपक्रमातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी देण्यासाठी मुंबई महापालिकेने बेस्ट उपक्रमाला निधी दिला असला तरी अद्याप सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांची देणी बेस्ट उपक्रमाने दिलेली नाहीत. न्यायालयाने आदेश देऊनही ही देणी देण्यात बेस्ट उपक्रमाला अपयश आले आहे. त्यामुळे उतारवयाकडे झुकलेले सेवानिवृत्त कर्मचारी आणखी हवालदिल झाले आहेत. कामगार नेते शशांक राव यांच्या संघटनेने ६ ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथे मोर्चाची हाक दिली आहे.

बेस्ट उपक्रमाचे चाक दिवसेंदिवस आर्थिक तुटीच्या गाळात रुतत आहे. पालिकेने गेल्या तीन – चार वर्षांपासून बेस्टला अनुदान दिले आहे. पालिकेने अनुदान दिले तरी बेस्टची आर्थिक तूट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे बेस्टला पालिकेने मदत करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी, कामगार नेत्यांकडून होऊ लागली आहे. बेस्ट उपक्रमाचा संचित तोटा वाढत असून बेस्टचा देनंदिन खर्च भागवणे, कामगारांचे पगार देणेही मुश्कील होऊ लागले आहे. बेस्ट उपक्रमाने आपला अर्थसंकल्प सादर करताना दोन हजार कोटींची तूट भरून काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडे अनुदानाची मागणी केली होती. मात्र मुंबई महापालिकेने २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात बेस्टसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील पहिला हफ्ता एप्रिल महिन्यात दिला तेव्हा मुंबई महापालिकेने अट घातली होती. मात्र तरीही या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना अद्याप देणी मिळालेली नाहीत. त्यामुळे ज्या कर्मचाऱ्यांना देणी मिळालेली नाहीत त्यांना सर्व रकमेवर १० टक्के व्याज द्यावे, अशी मागणी बेस्टचे सेवानिवत्त कर्मचारी विजय मयेकर यांनी केली आहे.

उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर, राज्य सरकारने आदेश दिल्यानंतरही अजून किती प्रतीक्षा करायची, असा सवाल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब या बाबतीत लक्ष घालून सर्व बेस्ट कर्मचाऱ्यांची देणी बेस्ट दिनी म्हणजेच ७ ऑगस्ट २०२५ पूर्वी देऊन सर्वांना दिलासा द्यावा. या रकमेचा आर्थिक भार मुंबई महानगरपालिका आणि राज्य शासनाने एकत्रितपणे उचलावा, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची देणी न दिल्यामुळे कामगारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. कौटुंबिक सभासद किंवा स्वतः च्या आजारपण, मुलांच्या उच्च शिक्षण, घराच्या उर्वरित कर्जाची परतफेड अथवा स्वतःचे घर घेण्यासाठी, मुला-मुलींची लग्नकार्ये वा तत्सम कार्यक्रम आदींसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांना पैशांची नितांत आवश्यकता आहे, काही जणांकडे तर न्यायालयात दावे दाखल करण्यासाठीही पैसे नाहीत. त्यामुळे बेस्टने कर्मचाऱ्यांची देणी लवकर द्यावी, अशी मागणी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी केली आहे.

आझाद मैदानावर बुधवारी मोर्चा

१ ऑगस्ट, २०२२ नंतर निवृत्त झालेल्या चार हजार ५०० हून अधिक सेवानिवृत्त बेस्ट कर्मचाऱ्यांची इतर देणी न दिल्यामुळे कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत. बेस्ट प्रशासनाने सेवानिवृत्त झालेल्या कामगारांना त्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम तत्काळ द्यावी आणि जे कर्मचारी भविष्यात बेस्टच्या सेवेतून सेवा निवृत्त होणार आहेत त्यांना सेवा निवृत्तीची देय असलेली रक्कम तातडीने मिळावी त्याचे नियोजन बेस्ट प्रशासनाने करावे, अशी मागणी बी.ई.एस.टी. वर्कर्स युनियनने केली आहे. यासाठी ६ ऑगस्ट २०२५ रोजी आझाद मैदानात मोर्चा काढण्यात येणार आहे, असा इशारा युनियनचे शशांक राव यांनी दिला आहे.

जाब कोणाला विचारायचा

बेस्टचे महाव्यवस्थापक श्रीनिवास नुकतेच सेवानिवृत्त झाले असून उपमहाव्यवस्थापकही सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आता दाद कोणाकडे मागायची, असा सवाल कर्मचाऱ्यांना पडला आहे.

बेस्टला पुढचा हफ्ता दोन दिवसात

बेस्टसाठी एक हजार कोटी रुपयांचे आर्थिक अनुदान देण्यासाठी चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्यापैकी १०० कोटी रुपये आतापर्यंत दिले आहेत. तर पुढचे २०० कोटी रुपये देण्यासाठी नुकतीच मंजुरी दिली असून येत्या दोन दिवसांत हा निधी दिला जाईल.- भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिका आयुक्त