मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या नवनियुक्त महाव्यवस्थापक डॉ. सोनिया सेठी यांची बेस्ट वर्कर्स युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी कुलाबा येथील बेस्ट भवन येथे भेट घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, दिवाळी भेट याबाबत चर्चा करण्यात आली. याबाबत महाव्यवस्थापक यांनी बेस्टच्या कर्मचाऱ्यांना मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मिळाणाऱ्या दिवाळी भेटी इतकीच रक्कम देण्याचे आश्वासित केले.

करोना भत्ता, दिवाळी भेट, प्रलंबित वेतनकरार, बेस्टने स्वमालकीच्या ३,३३७ बसगाड्यांचा बसताफा राखणे, बेस्टचा अर्थसंकल्प मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य अर्थसंकल्पात विलिनीकरण करणे, कंत्राटी कामगारांना समान कामाला समान दाम व इतर मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली. पुढील चर्चा लवकरात लवकर करून सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन महाव्यवस्थापकांनी दिले, अशी माहिती बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी दिली.