मुंबईच्याच नव्हे तर बेस्टच्या इतिहासातीलही एक गौरवशाली पर्व असलेल्या ट्रामचा एक डबा बेस्टने नुकताच भंगारात काढला होता. यासाठीची लिलाव प्रक्रियाही पूर्ण झाली होती आणि ही ट्राम केवळ साडेचार लाख रुपयांत विकण्यात आली होती. मात्र ही बाब महाव्यवस्थापकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत लिलावाची प्रक्रिया रद्द करून इतिहासाचा हा तुकडा भंगारात जाण्यापासून वाचवला.
मुंबईत ट्रामची शेवटची फेरी ३१ मार्च १९६४ रोजी झाली आणि त्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवरून ट्राम बेदखल झाली. बेस्टच्या विविध आगारांत असलेल्या अनेक गोष्टी जपून ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे बेस्टच्या आणिक आगारात ट्रामचा एक डबाही ठेवला होता. मात्र जुलै महिन्यात हा डबा भंगारात काढण्याबाबत हालचाली सुरू झाल्या. त्याची लिलाव प्रक्रियाही पार पडली आणि नदीम मेटल या कंपनीने हा डबा भंगारात काढण्यासाठी चार लाख ५५ हजार १०० रुपयांना विकतही घेतला. दरम्यान, ही बाब बेस्टचे महाव्यवस्थापक डॉ. जगदीश पाटील यांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी ही वादग्रस्त प्रक्रिया थांबवली. याबाबत समिती सदस्य रंजन चौधरी यांनी हरकतीचा मुद्दा मांडत प्रशासनाच्या ट्राम भंगारात काढण्याच्या निर्णयावर टीकास्त्र सोडले. जगभरात ऐतिहासिक वारसा जपण्याची अहमहमिका सुरू असताना बेस्ट आपला ऐतिहासिक वारसा भंगारात काढण्यास कशी धजावते, असा प्रश्न त्यांनी विचारला. या मुद्दय़ाला पाठिंबा देताना केदार होंबाळकर यांनीही चार लाखांसाठी ऐतिहासिक वारसा भंगारात काढण्याच्या प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली.
संग्रहित लेख, दिनांक 26th Aug 2015 रोजी प्रकाशित
मुंबईच्याच नव्हे तर बेस्टच्या इतिहासातीलही एक गौरवशाली पर्व असलेल्या ट्रामचा एक डबा बेस्टने नुकताच भंगारात काढला होता.
First published on: 26-08-2015 at 12:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best panel opposes move to scrap heritage tram