मुंबई : ‘बेस्ट’ उपक्रमाकडून विजेवर चालवण्यात येणाऱ्या दुमजली वातानुकूलित बसचा मकरसंक्रांतीचाही मुहूर्त हुकणार आहे. बस चाचण्यांच्या फेऱ्यामध्येच अडकली असून ती प्रवाशांच्या सेवेत फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात दाखल होणार आहे.
सध्या बेस्ट उपक्रमाकडे विनावातानुकूलित ४५ दुमजली बस आहेत. या बसची एकूण प्रवासी क्षमता ७६ आहे. अधिक प्रवासी क्षमतेमुळे या प्रकारातील अधिक बस टप्प्याटप्प्यात सेवेत आणण्याचा निर्णय उपक्रमाने घेतला असून अशा ९०० बस भाडेतत्त्वावर ताफ्यात येतील. यातील पहिल्या दुमजली बसचे उद्घाटन ऑगस्ट २०२२ मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर पुण्यात ‘एआरएआय’ केंद्रात या बसच्या चाचणीला सुरुवात झाली. त्यावेळी प्रमाणपत्र उपलब्ध होऊन सप्टेंबपर्यंत बस सेवेत येतील असे सांगण्यात आले. त्यानंतर ऑक्टोबर आणि नंतर १४ जानेवारीपर्यंतचा मुहूर्त जाहीर करण्यात आला, मात्र या बसची चाचणी अद्याप सुरूच आहे.
बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी पुण्यात ‘एआरएआय’मध्ये दुमजली वातानुकूलित बसची चाचणी सुरू असून त्यांना प्रमाणपत्र मिळताच त्या सेवेत करण्यात येतील. अशा पाच दुमजली बस येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ात दाखल होण्याची शक्यता आहे.
‘ओपन डेक’बसचीही योजना..
२ डिसेंबर २०२२ रोजी बेस्ट उपक्रमाने पत्रकार परिषदेत १४ जानेवारी २०२३ पर्यंत ५० दुमजली वातानुकूलित बस येणार असल्याचे सांगितले होते. एकूण ९०० वातानुकूलित बस बेस्टच्या ताफ्यात दाखल केल्या जाणार आहेत. यामधील काही विजेवरील दुमजली बसचे छत काढून ‘ओपन डेक’ बस करण्याची योजना बेस्टची असल्याचेही स्पष्ट केले होते.