scorecardresearch

ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार

पुढच्या आठवड्यात प्रीमियम बस सेवा, तर जानेवारीत ५० वातानुकूलित दुमजली बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा; पुढील सहा महिन्यांत ५०० टॅक्सी बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार
ओला, उबरच्या धर्तीवर बेस्टची टॅक्सी सेवा

मोबाइल ॲपआधारित आरक्षित केल्या जाणाऱ्या ओला, उबर आणि अन्य टॅक्सी सेवा कंपन्याच्या स्पर्धेत उतरण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. मोबाईल ॲपआधारित बेस्टची ई – टॅक्सी सेवा लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून टप्प्याटप्प्याने जून २०२३ पर्यंत ५०० टॅक्सी प्रवाशांच्या सेवेत दाखल करण्याचा बेस्टचा मानस असल्याचे लोकेश चंद्र यांनी सांगितले. तुलनेत ही सेवा स्वस्त असेल, असे संकेतही त्यांनी दिले.

हेही वाचा- मुंबईत ४२ वे अवयवदान; दोघांना मिळाले जीवदान

आरामदायी आणि वातानुकूलित २० प्रीमियम बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाल्या असून पुढील आठवड्यापासून ही सेवाही प्रवाशांना उपलब्ध होईल, असे चंद्र यांनी सांगितले. पहिली प्रीमियम सेवा वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) ते ठाणे आणि खारघर ते बीकेसी मार्गांवर धावणार आहे. मोबाइल ॲप आधारित टॅक्सीप्रमाणेच प्रीमियम बसमधील आसन आरक्षित करता येणार आहे.

हेही वाचा- “एक पठ्ठ्या ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम…”, सुषमा अंधारेंची राज ठाकरेंवर बोचरी टीका

उपक्रमाची विजेवर धावणारी दुमजली वातानुकूलित बस अद्यापही मुंबईकरांच्या सेवेत आलेली नाही. दुमजली बस आधी सप्टेंबरमध्ये आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होती. हे दोन्ही मुहूर्त टळल्यामुळे प्रवासी या बसच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, ५० दुमजली वातानुकूलित बस १४ जानेवारी २०२३ पर्यंत बेस्टच्या ताफ्यात दाखल होतील, असे चंद्र यांनी स्पष्ट केले. बेस्टच्या ताफ्यात एकूण ९०० वातानुकूलीत बस दाखल होणार आहेत. ताफ्यात दाखल होणाऱ्या विजेवर धावणाऱ्या काही दुमजली बसच्या वरील छत काढून ओपन डेक बस करण्याची बेस्टची योजना आहे.

प्रवासी बसमधून उतरताच थांब्यावरून त्याला इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी तात्काळ एक वाहतूक सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी बेस्ट उपक्रमाने मुंबईत विजेवर धावणारी दुचाकी सेवा जून २०२२ पासून सुरू केली आहे. जून २०२३ पर्यंत विजेवर धावणाऱ्या बेस्टच्या दुचाकींची संख्या पाच हजारपर्यंत वाढविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या विजेवर धावणाऱ्या ७०० दुचाकी सेवेत असून दोन महिन्यांमध्ये आणखी एक हजार दुचाकीची त्यात भर पडणार आहे.

हेही वाचा- डहाणुकरांसाठी खुषखबर…; लवकरच १५ डब्यांच्या लोकलमधून प्रवास घडणार

ई चार्जिंग सेवा

मुंबईकरांना विजेवर धावणाऱ्या वाहनांचे चार्जिंग करता यावे यासाठी मुंबईत ३३० ई-चार्जिग केंद्रे उभारण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. शहरातील बस आगार, बस स्थानके आणि खासगी गाड्या उभ्या करण्यासाठी जागा असलेल्या बस थांब्यावर चार्जिग केंद्रे उभारण्यात येणार आहेत. येत्या २ – ३ महिन्यांत ३३० चार्जिग केंद्रे मुंबईकरांसाठी खुली होतील.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2022 at 20:53 IST

संबंधित बातम्या