महाराष्ट्राच्या २०२३ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी भाजपा आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार खडाजंगी झाली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकी देत असल्याचा गंभीर आरोप केला. यानंतर भास्कर जाधव यांनी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला लगावला. तसेच आपली भूमिका स्पष्ट केली. ते सोमवारी (२७ फेब्रुवारी) अर्थसंकल्पीय अधिवेशनात बोलत होते.

भास्कर जाधव म्हणाले, “विधानसभा अध्यक्षांनी संपूर्ण देशात महाराष्ट्राच्या विधिमंडळाचा काय सन्मान आहे, काय आदराची भावना आहे हे सांगितलं. तसेच ते कायम राखण्याची जबाबदारी सर्वांची असल्याचं सांगितलं. आम्हाला हे मान्य आहे, मात्र माझी नम्र सूचना वजा विनंती आहे की, हे आमच्याकडून करून घेण्याची जबाबदारी सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावरील अध्यक्षांची आहे.”

“नाना पाटेकरांनी सांगितल्यावर तुम्ही आवाज बारीक केला”

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भास्कर जाधवांनी दम दिल्याचा आरोप केला. ठीक आहे, मागच्यावेळी मी सांगितलं की, माझा आवाज जरा मोठा आहे. तुमचाही आवाज मोठा होता. नाना पाटेकरांनी सांगितल्यावर तुम्ही आवाज बारीक केला अशी फडणवीसांची मुलाखत मी ऐकली,” असं म्हणत भास्कर जाधवांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला.

“मी केवळ एवढाच छोटासा विषय ऐकून घ्या सांगत होतो”

भास्कर जाधव पुढे म्हणाले, “मी केवळ एवढाच छोटासा विषय ऐकून घ्या सांगत होतो की, सर्वसाधारणपणे राज्यपालांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सत्ताधारी पक्षाने मांडायचा असतो. यावर पॉईंट ऑफ प्रोसिजर म्हणून मी सांगत होतो की, त्यावर सत्ताधारी पक्षाला पाठिंबा देणाऱ्या पक्षांपैकी एकाने उठून एखाद्या सन्माननीय सदस्याने त्याला अनुमोदन द्यायचं असतं.”

“अध्यक्षांनी ही गोष्ट सत्ताधाऱ्यांना सांगितली असती तर…”

“हा हट्टाचा, आग्रहाचा किंवा विरोधाचा भाग नाही, पण मी ही बाब आपल्या लक्षात आणून देत होतो. त्यामुळे अध्यक्षांनी ही गोष्ट सत्ताधाऱ्यांना सांगितली असती तर बरं झालं असतं. तसेच अध्यक्षांची अपेक्षा आमच्याकडून पूर्ण होईल, असंही नमूद करतो,” असं भास्कर जाधव यांनी सांगितलं.

हेही वाचा : “भास्कर जाधव विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का?”, देवेंद्र फडणवीस आक्रमक, म्हणाले, “सगळ्यांना…”

विधानसभेत नेमकं काय घडलं?

भास्कर जाधव यांनी माझा पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडू देत नाही असा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. तसेच काय चाललं आहे असा प्रश्न विचारला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“हे आम्ही खपवून घेणार नाही”

यानंतर देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले. ते म्हणाले, “भास्कर जाधव अशाप्रकारे विधानसभा अध्यक्षांना धमकावू शकतात का? अध्यक्षांना धमकावण्याची नवी व्यवस्था सभागृहात सुरू झाली आहे का? अध्यक्ष महोदय हे आम्ही खपवून घेणार नाही.”

“भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत”

“हे योग्य नाही. सगळ्यांना मांडण्याचा अधिकार आहे. पॉईंट ऑफ प्रोसिजर मांडा, मात्र, भास्कर जाधव चक्क अध्यक्षांना धमकावत आहेत. हे कसं चालेल,” असं फडणवीस यांनी म्हटलं.