लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : भायखळा (पूर्व) येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या (राणीची बाग) आवारातील डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाचे मुंबई महानगरपालिकेने नूतनीकरण केले आहे. नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून या संग्रहालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी ८ जानेवारी रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे.

भायखळ्यातील राणीच्या बागेच्या आवारात असलेल्या भाऊ दाजी लाड वस्तूसंग्रहायलयाचे नूतनीकरण पूर्ण झाले असून हे संग्रहायल लवकरच सर्वसामान्य व पर्यटकांसाठी खुले करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिका संचालित डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालयाच्या वास्तूच्या नूतनीकरणांतर्गत दुरुस्ती, पुनरुज्जीवन व जतनविषयक कामांसाठी मार्च २०२३ मध्ये कार्यवाही सुरू करण्यात आली होती. विहित वेळापत्रकानुसार १८ महिन्यांमध्ये सर्व कामे पूर्ण करण्यात आली. यामध्ये इमारतीच्या छतावर जलावरोध कामे, छताची अंतर्गत दुरुस्ती, तसेच त्यावरील नक्षीकाम पूर्ववत करणे, आतील व बाह्य गिलावा (प्लास्टर) दुरुस्ती, खिडक्यांची दुरुस्ती, जोतेक्षेत्राचे संरक्षण (प्लींथ प्रोटेक्शन), रंगकाम, कठडे, उतरंड (रॅम्प) इत्यादींचा समावेश होता. या सर्व कामांसाठी मिळून सुमारे २ कोटी ८० लाख रुपये खर्च करण्यात आले. नूतनीकरणामुळे या वास्तुला दिमाखदार, सुंदर रूप प्राप्त झाले आहे. नूतनीकरण प्रकल्पाचे सल्लागार म्हणून वास्तुविशारद विकास दिलावरी यांनी कामकाज पाहिले.

आणखी वाचा-बुलेट ट्रेन मार्गावरील २१० मीटर लांबीच्या पुलाचे बांधकाम पूर्ण

संग्रहालयाचा इतिहास

मुंबईचा पुरातन सांस्कृतिक वारसा, कला इतिहास उलगडून दाखवणारे डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय हे मुंबईतील सर्वात जुने संग्रहालय असून लंडनमध्ये १८५१ मध्ये भरलेल्या जागतिक प्रदर्शनाच्या निमित्ताने मुंबईतील संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. त्यानंतर १८५५ मध्ये व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालय या नावाने या संग्रहालयाची स्थापना झाली. जनतेसाठी १८५७ मध्ये टाऊन बराक येथे प्रत्यक्षात संग्रहालय खुले झाले.

संग्रहालयाच्या सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीची पायाभरणी १९ नोव्हेंबर १८६२ रोजी तत्कालीन गव्हर्नर सर हेन्री बार्टल फ्रेअर यांच्या हस्ते झाली. बांधकाम पूर्ण होवून १८७२ पासून या इमारतीत संग्रहालयाचा प्रारंभ झाला. संग्रहालय स्थापनेत मोलाचा वाटा उचलणारे डॉ. रामकृष्ण विठ्ठल ऊर्फ भाऊ दाजी लाड यांच्या सन्मानार्थ १ नोव्हेंबर १९७५ रोजी ‘डॉ. भाऊ दाजी लाड संग्रहालय’ असे नामकरण करण्यात आले.

आणखी वाचा-Mumbai Crime News : चोरी करायला काहीच मिळालं नाही म्हणून महिलेचं चुंबन घेऊन पळाला चोर, मुंबईतल्या मालाडमधली घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या संग्रहालयात विज्ञान, कला व अध्यात्म यांचा संगम आढळून येतो. मातीची लघू शिल्पे, नकाशे, पाषाणावरून केलेली मुद्रांकने, छायाचित्रे, दुर्मिळ पुस्तके इत्यादी त्यातील विशेष आकर्षणे आहेत. सहा विविध भागांमध्ये संग्रहालयाची रचना करण्यात आलेली आहे. मुंबईचा इतिहास, औद्योगिक, कला, १९ व्या शतकातील चित्रे, संस्थापकांची दर्शनिका, कमलनयन बजाज मुंबई दर्शनिका आणि कमलनयन विशेष प्रदर्शन दर्शनिका यांचा या रचनेमध्ये समावेश आहे.