मुंबईतल्या घाटकोपर या ठिकाणी मे महिन्यात भलं मोठं होर्डिंग कोसळून भीषण अपघात झाला. या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेवरुन आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही रंगलं होतं. अशात आता घाटकोपर दुर्घटना ही अॅक्ट ऑफ गॉड असून मला या प्रकरणात जामीन मिळावा अशी याचिका मुख्य आरोपी भावेश भिंडेंने मुंबई उच्च न्यायालयात केली आहे.

भावेश भिंडे यांचा जामीन मिळण्यासाठी अर्ज

इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भावेश भिंडे यांनी जामीन मिळावा म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की १३ मे रोजी होर्डिंग कोसळण्याची घटना घडली. त्यात १७ लोकांचा मृत्यू झाला तर ८० लोक जखमी झाले. ही घटना नैसर्गिक आपत्तीचा भाग होती, त्यामुळे यासाठी मला जबाबदार धरु नये. अॅक्ट ऑफ गॉड अर्थात जे काही घडलं ते देवामुळे घडलं असं म्हणत त्यांनी जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली आहे. तसंच याचिकेत त्यांचे दावे सिद्ध करण्यासाठी त्यांनी याचिकेत ब्युफोर्ट स्केलचा उल्लेख केला आहे, ज्यानुसार वाऱ्याचा वेग मोजला जातो. आता याबाबत मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

मुंबईत जोरदार धुळीचं वादळ येण्याची शक्यता नव्हती

भिंडे यांनी केलेल्या याचिकेत असंही म्हटलं आहे की १२ मे २०२४ या दिवशी दुपारी १.४५ ला जो हवामान अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला त्यात मुंबईत धुळीचं वादळ येऊ शकतं किंवा जोरदार वारे वाहू शकतात अशी शक्यताही किंवा अंदाज वर्तवण्यात आला नव्हता. मात्र १३ मे रोजी ताशी ६० किमी प्रतितास ते ९६ किमी प्रतितास या वेगाने वाऱ्यांचा तडाखा मुंबईला बसला. ही बाब नैसर्गिक होती, तसंच यापूर्वी कधी अनुभवली गेली नाही. त्यामुळे जो तडाखा बसला ती नैसर्गिक आपत्ती आहे, देवामुळेच हे सगळं घडलं असंही म्हटलं आहे.

घाटकोपर फलक दुर्घटना : ३,३०० पानांचे आरोपपत्र दाखल

१३ मे रोजी काय घडलं?

१३ मे रोजी वादळी वाऱ्यांमुळे घाटकोपरमध्ये महाकाय फलक कोसळून पडला होता. पेट्रोल पंपावर पडलेल्या या फलकाखालून १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. १५, १६ आणि १७ मे पर्यंत मदत आणि बचावकार्य सुरु होतं. सुरुवातीला या होर्डिंगच्या ढिगाऱ्याखालून १४ मृतदेह काढण्यात आले. त्यानंतर २ मृतदेह काढण्यात आले. तर एकाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. या घटनेसाठी आपण जबाबदार नाही तर देव जबाबदार आहे असं आता भावेश भिंडेंनी म्हटलं आहे आणि त्यांनी जामीन मिळावा म्हणून याचिका दाखल केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

कोण आहेत भावेश भिंडे?

मुंबईत १३ मे रोजी अचानक वादळी वारे वाहू लागले. सर्वत्र धूळ पसरली होती. वाऱ्याचा वेग ६० किमी प्रतितास होता. परिणामी घाटकोपर येथील पूर्व द्रुतगती मार्गावर लावलेलं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत १७ जणांचा मृत्यू झाला. इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने हे होर्डिंग लावले होते. भावेश भिंडे या कंपनीचे संचालक आहेत. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सुरुवातीला भावेश भिंडे फरार झाले होते मात्र नंतर त्याला अटक करण्यात आली.

Ghatkopar hoarding collapse tragedy
घाटकोपरमध्ये १३ मे रोजी झालेल्या दुर्घटनेने १७ बळी घेतला आहे. छाया : दीपक जोशी

होर्डिंगची लिम्का बुकमध्ये नोंद

दुर्घटनेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने (बीएमसी) एक निवेदन जारी करून हे जाहिरात फलक त्यांच्या परवानगीशिवाय बांधण्यात आल्याचे स्पष्ट केलं. BMC ने जारी केलेल्या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, पंत नगर येथील ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील पेट्रोल पंपावर असलेले हे होर्डिंग हे अनधिकृत असून यासाठी महापालिकेने परवानगी दिलेली नव्हती असंही नमूद करण्यात आलं. हे होर्डिंग सुमारे १७,०४० स्क्वेअर फूट मोठं होतं. या होर्डिंगची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सर्वात मोठं होर्डिंग म्हणूनही केली गेली होती.