मुंबई : भिवंडी येथील गरीब आणि आदिवासींचे धर्मांतर करत असल्याच्या आरोपांतर्गत अटकेत असलेल्या अमेरिकन नागरिकाच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. आपल्याला झालेली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा करून या अमेरिकन नागरिकाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका करण्यात आली आहे.
भिवंडीतील स्थानिक गावकऱ्यांना ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्ता जेम्स लिओनार्ड वॉटसन याच्यावर आहे. याप्रकऱणी त्याला ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आली होती व सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सोमवारी सुनावणी झाली. त्यावेळी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. ही वस्तुस्थिती असताना त्याला आहे त्या स्थितीत (जिवंत किंवा मृत) न्यायालयासमोर हजर करण्याची मागणी करणे अयोग्य असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.
असे असले तरी न्यायालयाने योग्य मागण्यांसह सुधारित याचिका करण्याचे आदेश याचिकाकर्त्यांच्या वकिलांना दिले. या प्रकरणी जामिनासाठी अर्ज करणे हा एकमेव पर्याय असल्याचेही न्यायालयाने सुधारित याचिका करण्याचे आदेश देताना स्पष्ट केले. त्याची दखल घेऊन याचिकाकर्त्यांच्या वतीने सुधारित याचिका करण्यासाठी वेळ देण्याची विनंती करण्यात आली. ती न्यायालयाने मान्य करून प्रकरणाची सुनावणी मंगळवारी ठेवली.
प्रकरण काय ?
बी-२ व्यवसाय व्हिसावर वॉटसन पत्नीसोबत ठाण्यात वास्तव्यास आले होते. याचिकेनुसार, भिवंडी येथील ख्रिश्चन कुटुंबाने त्यांना ३ ऑक्टोबर रोजी प्रार्थना सभेसाठी घरी आमंत्रित केले होते. तक्रारदाराने राजकीय हेतुने आणि गावातील रहिवासी नसतानाही जबरदस्तीने खासगी मालमत्तेत प्रवेश केला, तसेच, तेथून याचिकार्त्याला बाहेर काढले आणि त्याच्यावर गावकऱ्यांचे धर्मांतर करत असल्याचा आरोप केला. तक्रारीनंतर याचिकाकर्त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादूटोणा २०१३, बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायदा,आणि परदेशी नागरिक कायद्यांतर्गंत गुन्हा नोंदवण्यात आला.