राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना डेंग्यूची लागण झाली नसल्याचे जे. जे.रुग्णालयातील डॉक्टरांनी दिले आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी अटतेनंतर आर्थर तुरुंगात असणारे भुजबळ गेल्या दोन दिवसांपासून तापाने त्रस्त होते. प्रकृती अधिकच खालावल्यानंतर त्यांना मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या तपासण्या सुरू असून त्यांच्यावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. दरम्यान, त्यांच्या आजारामध्ये डेंग्यूची कोणतीही लक्षणे नसल्याची माहिती जे.जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.
भुजबळ यांना डोकेदुखी, अंगदुखी आणि तापाने अस्वस्थत केले होते. त्यामुळे त्यांना जे.जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सध्या मुंबईमध्ये डेंग्यूची साथ असल्यामुळे भुजबळांना डेंग्यूची लागण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. मात्र, डॉक्टरांच्या स्पष्टीकरणामुळे भुजबळांना डेंग्यू नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अंगदुखी, ताप आणि रक्तदाब यामुळे त्रस्त असणाऱ्या छगन भुजबळांची जे. जे. रूग्णालयातील डॉक्टारांच्या पथकाने तुरूंगात जाऊन तपासणी केली होती. त्यानंतर त्यांना जे.जे. रूग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.