लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : पुण्यात पोर्शे या आलिशान मोटरगाडीने एका अल्पवयीन मद्यपी मुलाने दोन तरुणांना चिरडल्याचे प्रकरण ताजे असताना मुंबईतही माझगाव येथे १५ वर्षांच्या मुलगा दुचाकी चालवत असताना झालेल्या अपघातात एका ३२ वर्षीय तरूणाला प्राण गमवावे लागले आहेत. या अपघातात अल्पवयीन मुलगाही किरकोळ जखमी झाला असून याप्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहेत. अल्पवयीन मुलाची वैद्यकीय चाचणी करून त्याची रवानगी डोंगरी निरीक्षणगृहात करण्यात आली आहे. मुलाच्या वडिलांना याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.

माझगाव नेसबीट पुलावरील गुरूवारी सकाळी सातच्या सुमारास हा अपघात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने जात असताना अपघात झाला. त्या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला असून विरूदध बाजूने येणारा १५ वर्षीय विधीसंघर्षग्रस्त बालक हा किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात मृत्यू झालेला तरूण दुचाकी घेऊन माझगाव डॉक सर्कल येथून नेसबीट पुला मार्गे जे जे रोड च्या दिशेने जात होती. त्यावेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या अल्पवयीन मुलाच्या दुचाकीने त्यांना धडक दिली. अल्पवयीन मुलगा नेसबीट जंक्शन येथून माझगाव कडे जात होता. या अपघातात इरफान नवाबअली शेख (३२) यांचा मृत्यू झाला आहे.

आणखी वाचा-मुंबई : खड्ड्याच्या सर्वेक्षणासाठी दुचाकीवरून फिरा, पालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश

सर जे जे मार्ग पोलिसांनी भादंवि कलम कलम २७९, ३०४ (२), ४२७, ३४ तसेच मोटर वाहन कायदा कलम ५/१८०,१८४, १८८, १९९(अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अपघातानंतर विधीसंघर्षग्रस्त मुलाची तात्काळ वैदयकीय तपासणी करून त्यास डोंगरी निरीक्षण गृह येथे ठेवण्यात आले आहे. वैद्यकीय चाचणीचा अहवाल अद्याप प्रलंबीत आहे. पण प्राथमिक पाहणीत मुलाने मद्यप्राशन केले नसल्याचे आढळून आल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलगा नागपाडा परिसरातील रहिवासी आहे. या मुलाच्या वडिलांना या गुन्ह्यांत अटक करण्यात आली आहे.