मुंबई: मुंबईतील रस्त्यावंर पडलेले खड्डे वाहनचालकांसाठी जीवघेणे ठरत आहेत. शनिवारी पवईतील जोगेश्वरी लिंक जोड रस्त्यावर (जेव्हीएलआर) खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. लालू कांबळे (५९) असे या अपघातात मरण पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पाण्याने भरलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार लालू कांबळे यांचा तोल गेला आणि मागून येणार्या डंपरने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला.
अंधेरीच्या महाकाली लेणी परिसरात लालू कांबळे (५९) रहात होते. शनिवारी दुपारी ते आपल्या दुचाकीवरून (एमएच-०२ जीजी ५४३६) पवईतील जोगेश्वरी-विक्रोळी रस्त्यावरून विक्रोळीच्या दिशेने जात होते. दुपारी सव्वा दोनच्या सुमारास एनटीपीसी सिग्नल जवळ असलेल्या खड्ड्यामुळे त्यांची दुचाकी घसरली. त्याचवेळी मागून येणाऱ्या डंपरने त्यांना धडक दिली. या अपघातात कांबळे यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
अपघातानंतर गस्तीवरील पोलिसांनी डंपर जालक साजिद शेख (२५) याला ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात पवई पोलीस ठाण्यात भरधाव वेगाने वाहन चालवणे तसेच निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकऱणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तो गोवंडीच्या शिवाजी नगर येथे राहणारा आहे.ज्या रस्त्यावर अपघात घडला तेथे दोन मोठे खड्डे आहेत. कांबळे यांची दुचाकी एका खड्ड्यात गेली. तो खड्डा अरूंद असलयाने वेग मंदावला आणि त्याचवेळी मागून येणार्या डंपरने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे पवई पोलिसांनी सांगितले. लालू कांबळे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि नातवंडासह असा परिवार आहे.
हा मृत्यू खड्ड्यांमुळेच, कुटुंबियांचा आरोप
लालू कांबळे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. माझ्या वडिलांचा मृत्यू खड्ड्यांमुळेच झाला आहे आणि या दुर्घटनेला पालिकाच जबाबदार आहे, असा आरोप मयत लालू कांबळे यांचा मुलगा सचिन कांबळे (३२) याने केला आहे. संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी त्यांनी केली. सामाजिक कार्यकर्ते राजन माकणीकर यांनी देखील खड्डे जीवघेणे बनत असल्याचे सांगितले. अपघानंतर रुग्णवाहिका त्वरीत उपलब्ध झाली नाही, असेही ते म्हणाले.
मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे धोकादायकच
पावसाळ्यात जोरदार आणि सतत पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांवरील पृष्ठभाग झपाट्याने खराब होतो. नाल्यांची व्यवस्था अपुरी असल्याने पाणी रस्त्यावर साचते आणि त्यामुळे खड्डे खोल होतात. याशिवाय ठेकेदारांकडून निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जाते. पावसाळ्यापूर्वी केलेली डागडुजी तात्पुरतीच असते. सिमेंट वा डांबरी थर योग्य पद्धतीने न घातल्यामुळे खड्डे लगेच निर्माण होतात. दुचाकीस्वारांचे खड्ड्यांमुळे नियंत्रण सुटते आणि ते रस्त्यावर पडतात. अचानक ब्रेक मारल्यास मागील वाहन जोरात धडकते आणि त्यामुळे प्राणघातक अपघात होतात. खड्ड्यांमुळे दरवर्षी अनेक अपघात होतात. काही प्रकरणांत मृत्यूदेखील होतो. रस्त्यांवरील खड्डे हे दुचाकीस्वारांसाठी सर्वात धोकादायक ठरतात. खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मणक्याशी संबंधित समस्या निर्माण होत असतात.