मुंबई: ट्रकमधून क्रेन घेऊन जात असताना लोखंडी साखळी तुटल्याने पूर्व द्रुतगती मार्गावर शनिवारी सकाळी क्रेन कोसळली. या अपघातात एक दुचाकी चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर शीव रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खड्डा खोदणारी मोठी क्रेन घेऊन अलिबाग येथून एक ट्रक निघाला होता. शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास भांडुप येथे पूर्व द्रुतगती मार्गावरील घाटकोपर उड्डाणपूल उतरत असताना अचानक या क्रेनला बांधण्यात आलेली लोखंडी साखळी तुटली. त्यानंतर  क्रेन ट्रकवरून खाली रस्तावर कोसळली.

हेही वाचा >>> वांद्रयातील म्हाडा भवनात आता नागरी सुविधा केंद्र; नागरिकांची पायपीट थांबणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पहाटेच्या वेळी पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांची  वर्दळ जास्त नव्हती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. मात्र या अपघात विपुल पांचाळ (४४) हा दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. दुचाकी चालकाच्या पायावर क्रेनचा काही भाग कोसळल्याने त्याचा पाय पूर्णपणे निकामी झाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शीनी दिली आहे. दुचाकी चालकाला तत्काळ शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर पूर्व द्रुतगती मार्ग काही वेळ बंद करून वाहतूक जोड रस्त्यावरून वळवण्यात आली होती. त्यामुळे सकाळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अखेर वाहतूक पोलिसांनी ट्रक आणि क्रेन बाजूला केल्यानंतर अकराच्या सुमारास तेथील वाहतूक सुरळीत झाली. याबाबत पंतनगर पोलिसांनी ट्रक चालक लालताप्रसाद यादव (५९) याच्यावर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे.