भाजपा आमदार मिहिर कोटेचा यांनी मराठी गायक राहुल देशपांडे यांचा अपमान केल्याचा दावा ठाकरे गटातील आमदार सचिन अहिर यांनी केला आहे. सचिन अहिर यांनी कार्यक्रमातील व्हिडीओ ट्वीट करत भाजपाला लक्ष्य केलं आहे. बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफचा सत्कार करण्यासाठी राहुल देशपांडे यांचं गाणं थांबवण्यात आल्याचा सचिन अहिर यांचा आरोप आहे. दरम्यान सचिन अहिर यांच्या आरोपाला भाजपा नेते आशिष शेलार यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना प्रत्युत्तर दिलं आहे.

‘मराठी कलाकारांची चेष्टा’, भाजपाच्या कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान? टायगर श्रॉफचा सत्कार करण्यासाठी गाणं थांबवल्याचा आरोप

वरळीमधील जांबोरी मैदानात दिवाळीनिमित्त भाजपाकडून ‘मराठी सन्मानाचा आपला मराठमोळा दीपोत्सव’ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गायक राहुल देशपांडे आपलं गाणं सादर करत होते. याचवेळी टायगर श्रॉफ कार्यक्रमस्थळी पोहोचला. यामुळे त्याचा सत्कार करण्यासाठी भाजपा आमदार मिहीर कोटेचा यांनी राहुल देशपांडे यांना काही वेळासाठी गाणं थांबवण्यास सांगण्यात आलं असा आरोप आहे.

सचिन अहिर काय म्हणाले आहेत?

“नवरात्रोत्सव, गणेशोत्सव, दहीहंडी तसंच इतर सणांच्या माध्यमातून आपण मराठी माणसांची अस्मिता जपण्याचा प्रयत्न करत असल्याचं हे दाखवत आहेत. पण या व्हिडीओमुळे यांची खऱ्या अर्थाने मराठी माणूस आणि कलाकरांबद्दल अस्मिता काय आहे हे दिसत आहे. निवडणूका आल्यानंतर अशा गोष्टी करायच्या, पण नंतर कोणत्याच कार्यक्रमांचं आयोजन केलं जात नाही,” असं सचिन अहिर यांनी म्हटलं आहे.

“ज्येष्ठ कलाकार गाणं गात असताना दोन वेळा अडवणूक झाल्याने त्यांनीच मला तरी बोलू द्या किंवा तुमचे कार्यक्रम करा असं सांगितलं. टायगर श्रॉफही मुंबईतच मोठा झाला आहे. त्यामुळे त्याला विरोध असण्याचं कारण नाही. पण तुम्ही खऱ्या अस्मितेच्या गोष्टी करता आणि अशाप्रकारे कलाकारांचे अपमान करता,” असा संताप सचिन अहिर यांनी व्यक्त केला आहे. दिलगिरी व्यक्त केली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आशिष शेलार यांचं प्रत्युत्तर

“उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे जावं आणि नाव बदलून घ्यावं. आपलं नाव रडकी सेना ठेवावं. काही झालं तरी रडत असतात. स्वत: काही करायचं नाही, मराठी माणसाशी नाळ नाही, कार्यक्रम करायचे नाहीत आणि अपयश लपवण्यासाठी रडायचं हाच धंदा सुरु केला आहे. सचिन अहिर त्यांचे नेते असून तेच काम करत आहेत,” अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

खरोखरच अपमान झालाय का? असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले “असा कोणताही अपमान झालेला नाही. उलट मराठी माणसाच्या मराठमोठ्या दिपोत्सवात हिंदी कलाकार येत आहेत हा मराठी माणसासाठी अभिमानाची बाब आहे. भाजपाकडून मराठी माणसाचा सन्मान होतोय याची कोल्हेकुई सचिन अहिर यांची आहे”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिलगिरी व्यक्त करा – सचिन अहिर

आशिष शेलार यांच्या टीकेला सचिन अहिर यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं की “स्वत: राहुल देशपांडे यांनी एक तर मला गाऊ द्या, २० मिनिटं सादरीकरणं करतो नंतर तुम्ही हवं ते सोपस्कर करा असं सांगितलं होतं. मी उठून जाऊ का असंही ते म्हणाले होते. मराठीत बोलल्यानंतर मिहीर कोटेचा यांना कळलं नसेल म्हणून त्यांनी इंग्रजीत सांगितलं. पण तरीही नंतर ते मंचावर आले आणि टायगर श्रॉफचा सत्कार करुन गेले. त्यामुळे त्यांनी दिलगिरी तरी व्यक्त करावी. पण त्यांच्याकडून आता ती अपेक्षाही नाही”.