राजकारणात वेगवेगळ्या पक्षातील नेते हे लोकांसमोर एकमेकांचे विरोधक असल्याचे दाखवत असले तरी खासगीत मात्र त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण असतात, असा समज पुढाऱ्यांबाबत असते. हा समज दृढ करणारा एक प्रसंग काल (दि. ४ जुलै) वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळाला. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली आपल्या क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० विश्वचषक जिंकला. त्यांच्या स्वागतासाठी मरीन ड्राईव्ह ते वानखेडे विजयी परेड काढली गेली. यावेळी भारतीय क्रिकेटपटूंची एक झालक पाहण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने चाहते जमा झाले. यामध्ये काही आमदारही होते. आमदारांची आणि क्रिकेटपटूंची भेट घडवून देण्यासाठी बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार स्वतः पुढाकार घेत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

काल दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रोहित पवार यांनी विजयी परेड काढण्याआधी बीसीसीआयवर येथेच्छ टीका केली. विजयी परेडसाठी गुजरातमधून बस आणण्याबाबत नाराजी व्यक्त करताना मुंबईच्या बेस्ट बसला डावलल्याचा आरोप त्यांनी केला. त्याच रोहित पवार आणि राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांची भेट रोहित शर्माशी करून देण्यासाठी आशिष शेलार यांनी धावाधाव केल्याचे चित्र वानखेडेवर पाहायला मिळाले.

एबीपी माझा या वृत्तवाहिनीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये आशिष शेलार हे धावत धावत जाऊन रोहित शर्माला थांबविल्याचे दिसते. त्यांच्यामागून आमदार रोहित पवार आणि संदीप क्षीरसागर हे चालत येतात. त्यानंतर बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार स्वतःहून दोन्ही आमदारांची ओळख रोहित शर्माशी करून देतात. विधीमंडळात एकमेकांवर तुटून पडणारे हे दोन नेते क्रिकेटच्या मैदानात मात्र एकत्र असल्याचे चित्र यानिमित्ताने दिसले.

क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस, विरोधकांची सरकारवर टीका; म्हणाले, “आमची BEST…”

दरम्यान रोहित पवार यांनी या भेटीचे फोटो आपल्या सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

तत्पूर्वी दुपारी रोहित पवार म्हणाले होते, “भारतीय संघाच्या खेळाडूंना देशाने ताकद दिली, त्यामुळे आपण ही स्पर्धा जिंकू शकलो, याचा आम्हाला अभिमान आहे. पण मुंबईत भारतीय संघ येत आहे आणि जर का विजयी मिरवणूक काढली जात असेल तर मुंबईची बेस्ट बस यासाठी वापरायला हवी होती. बेस्ट बस आणि मुंबई अशी एक वेगळी ओळख आहे. त्यामुळे बेस्टची बस वापरली गेली असती, तर आम्हाला आणखी आनंद झाला असता. बीसीसीआयने गुजरातहून बस आणलीच आहे, पण त्यांनी बेस्टच्या बसची निवड करायला हवी होती.”

विजयी मिरवणुकीनंतर रोहित पवार यांनी आज सकाळीही सरकार आणि बीसीसीआयवर टीका केली. विधीमंडळात माध्यमांशी बोलत असताना ते म्हणाले की, टी-२० विश्वचषक हा भारतीय संघाने जिंकला आहे. मात्र विधीमंडळात आज क्रिकेटपटूंचे स्वागत करण्यासाठी जे फलक लावण्यात आले, त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो लावले आहेत. वास्तविक विजयानंतर चषक उचलणाऱ्या खेळाडूंचा फोटो त्यावर असायला हवा होता. मात्र क्रिकेट संघाच्या विजयाचेही श्रेय सरकार घेऊ पाहत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान विजयी मिरवणुकीच्या बसवर बीसीसीआयचे खजिनदार आशिष शेलार उपस्थित होते. त्याचेही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खेळाडूंबरोबर शेलार उपस्थित असल्यामुळे अनेक युजर्स त्यांना ट्रोल करत आहेत.