राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाने तिसरा तर शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा नेत्यांची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, सतेज पाटील, अनिल देसाई, सुनील केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा तीन जागा लढण्यावर ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

“महाविकास आघाडीच्या नेत्यांचा काल देवेंद्र फडणवीस यांना फोन आला होता. त्यानुसार छगन भुजबळ, अनिल देसाई आणि सुनिल केदार हे भेटण्यासाठी आले होते. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आज ३ वाजेपर्यंत माघार घेण्याचा वेळ आहे. गेल्या २० वर्षापासून राज्यसभेच्या, विधानसभेच्या निवडणुका बिनविरोध घेण्याची परंपरा आहे. पण निवडणूक तथ्यांच्या आधारे बिनविरोध होते. त्यामुळे आमचा आग्रह आहे की भाजपाला राज्यसभेच्या तिन्ही जागा मिळाव्यात आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीच्या बाबतीत काही विचार करता येईल. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी खूप चर्चा झाल्यानंतर तोच प्रस्ताव वारंवार मांडला,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार? महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट!

“आम्ही त्यांना म्हटलं की आमचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे राज्यसभा जास्त महत्त्वाची असते. एकाच पक्षाची आमच्याकडे ३० मते आहेत. आम्हाला ११ -१२ मतं कमी पडत आहेत. तुम्ही मते गोळा करुन सुद्धा ३० च्या पुढे जात नाही आहात. मागच्या वेळी आमच्या तीन जागा होत्या आणि त्या आम्हाला मिळाव्यात हा मुद्दा आहे. आम्ही त्यांना सांगितले की विधानपरिषदेची पाचवी जागा लढवणार नाही, तुम्ही राज्यसभेचा तिसरा उमेदवारी अर्ज मागे घ्या. यावर ते आम्ही विचार करु असे सांगून गेले आहेत. आम्ही तिसरी जागा लढवणार आहोत,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

आम्ही तीन राज्यसभेच्या जागा लढवतो आणि तुम्ही एक उमेदवार मागे घ्या हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला नाही तर ही निवडणूक होणार आणि आम्ही जिंकणार. या संदर्भात केंद्राशी बोलणं झालं आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींनीही आमची भूमिका योग्य असल्याचं म्हटलं. यू गो विथ दॅट स्टॅंड असं पक्षश्रेष्ठींनी सांगितले, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राज्यात शक्यतो राज्यसभा आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडण्याची परंपरा आहे. याआधी २०१० मध्ये विधान परिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक झाली तेव्हा प्रत्यक्ष मतदान झाले होते. तेव्हा मतांची मोठ्या प्रमाणावर फाटाफूट होऊन काँग्रेसचा चौथा उमेदवार निवडून आला होता, तर भाजपाच्या शोभाताई फडणवीस या पराभूत झाल्या होत्या. तत्पूर्वी २००८ मध्ये काँग्रेसच्या मतांमध्ये फाटाफूट होऊन पक्षाचे उमेदवार सुधाकर गणगणे हे पराभूत झाले होते. राज्यसभा किंवा विधान परिषद निवडणुकांमध्ये राज्यात यापूर्वी धक्कादायक निकाल लागले होते.