राज्य सरकारची कामगिरी, मुंबई महापालिका निवडणुकीसह पक्षांतर्गत निवडणुका व अन्य महत्त्वाच्या मुद्दय़ांवर भाजपच्या प्रदेश नेत्यांची चिंतन बैठक २३ व २४ जानेवारीला लोणावळ्याला होणार आहे. राज्यातील काही महत्वाच्या प्रश्नांवरही बैठकीत विचारविनिमय होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असून त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड होईल. रावसाहेब दानवे यांची फेरनियुक्ती होणे अपेक्षित आहे. पण अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर विचारविनिमय व निवडणुकीची रणनीती ठरविण्यासाठी चिंतन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीस प्रदेश सुकाणू समितीतील नेते, भाजपचे मंत्री, खासदार, काही आमदार, मुंबई अध्यक्ष आदींना निमंत्रित करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेसाठी स्वबळावर लढायचे की शिवसेनेशी युती करायची, याविषयी विचारविनिमय होणार आहे. स्वबळावर लढल्यास सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होईल. त्यामुळे शिवसेनेला दुखवावे की नाही, त्याचबरोबर विधानसभेप्रमाणेच शेवटपर्यंत शिवसेनेला युती करायची आहे, असे सांगून झुलवत ठेवण्याची रणनीती ठरविली जाईल, असे सूत्रांनी सांगितले.
मुंबईत लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजपची ताकद वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे किमान निम्म्या जागा शिवसेनेने दिल्या तरच युती करायची, अन्यथा नाही, असे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2016 रोजी प्रकाशित
भावी रणनीतीसाठी भाजपची चिंतन बैठक
भाजपच्या पक्षांतर्गत निवडणुकांचा कार्यक्रम सुरू असून त्यानंतर प्रदेशाध्यक्षांची निवड होईल.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 12-01-2016 at 03:14 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp meeting to decide future strategy