भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले असले तरी नाशिकमधील ‘आघाडीत बिघाडी’ करण्याबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी सध्या सबुरीचे धोरण स्वीकारले आहे. ठाकरे यांनी मोदी यांच्यावर टीकेची झोड उठविणे सुरूच ठेवल्यास आघाडीचा फेरविचार करण्यात येईल, असे ज्येष्ठ भाजप नेत्यांनी सांगितले.
मोदी यांच्यावर टीका केल्याने आणि महापालिकेच्या कामांची उद्घाटने करण्याच्या कार्यक्रमांमध्ये भाजप नेत्यांना डावलण्यात आले. मनसेची ही दादागिरी आणि मोदींसारख्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीतील नेत्यावर टीका सहन करून ही आघाडी सुरू ठेवू नये, असा स्थानिक भाजप नेत्यांमध्ये मतप्रवाह आहे. त्यांनी आपली मते प्रदेश पातळीवरील वरिष्ठ नेत्यांना कळविली आहेत. ही आघाडी संपुष्टात आणावी, असेही काही नेत्यांचे म्हणणे आहे.
मात्र सध्या आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये अधिकाधिक जागाजिंकण्यावर भाजपचा भर आहे. महायुतीमध्ये सामील होणार नसल्याचे राज ठाकरे यांनी अनेकदा स्पष्ट केले असले, तरी भाजप नेत्यांना तशी अंधुकशी आशा अजूनही वाटत आहे. निवडणुकीआधी महायुती झाली नाही, तरी आवश्यकता भासल्यास सत्तेसाठी मदत घ्यावी लागली, तर मनसेशी उगाच टोकाचे मतभेद सध्या करू नयेत, असा वरिष्ठ नेत्यांचा कल आहे. त्यामुळे नाशिकमधील आघाडी तोडण्याबाबत भाजपने सबुरीचे धोरण स्वीकारले आहे.
दरम्यान, स्थानिक नेत्यांनी आघाडीबाबत पाठविलेल्या प्रस्तावावर अजून कोणताही निर्णय घेण्यात आला नसून विचारविनिमय सुरू असल्याचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.
राज यांचे मौन
शहरात सिंहस्थांतर्गत विविध विकासकामांचा शुभारंभ शनिवारी भाजपने टाकलेल्या बहिष्कारामुळे राज ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अतिशय घाईघाईने उरकण्याची नामुष्की मनसेवर ओढावली. जवळपास २७ कामांचे भूमिपूजन अवघ्या दोन तासांत करताना राज यांनी भाजपच्या बहिष्काराच्या मुद्दय़ावर मौन बाळगणे पसंत केले. या कार्यक्रमावेळी राज यांच्या मोटारीमागे मनसे पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा भलामोठा ताफा असल्याने शहरातील अनेक भाग वाहतूक कोंडीत सापडले.
राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधल्यामुळे नाशिक महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या मनसे व भाजप आघाडीत मतभेद निर्माण झाले. त्याची परिणती भाजपने या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात झाली. मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे मन वळविण्याचे आटोकाट प्रयत्न केले, परंतु त्यांना अपयश आल्याचे शनिवारी पाहावयास मिळाले. राज यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाकडे भाजपचा एकही नगरसेवक वा पदाधिकारी फिरकला नाही. त्यांच्या अनुपस्थित मनसेला हा कार्यक्रम पार पाडणे भाग पडले. तासाभराच्या विलंबाने सुरू झालेल्या या कार्यक्रमात त्यांच्या मोटारीमागे मनसेचे आमदार, महापौर, नगरसेवक व पदाधिकारी यांच्या वाहनांची लांबलचक रांग होती. परिणामी, हा ताफा ज्या ज्या मार्गावरून मार्गस्थ झाला, तेथील वाहतुकीचा बोजवारा उडाला. अशोकस्तंभ चौकातील कार्यक्रमाने तर मध्यवर्ती रस्त्यांवरील वाहतूक कोलमडून पडली. महापालिका आयुक्त, ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन करण्यात आले.
भाजपने बहिष्कार टाकताना राज ठाकरे यांची काँग्रेसधार्जिणी भूमिका कायम राहिल्यास महापालिकेत एकत्रित राहायचे की नाही याचाही फेरविचार करण्याचा इशारा दिला आहे. कार्यक्रमात ते या मुद्दय़ावर काही तरी बोलतील अशी खुद्द मनसेच्या पदाधिकाऱ्यांना अपेक्षा होती; परंतु संपूर्ण दौऱ्यात राज यांची ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ अशी अवस्था होती.
सत्ताधारी भाजपप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या विरोधी पक्षांतील कोणी नगरसेवक वा पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर दुपारी राज ठाकरे मुंबईकडे रवाना झाले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2014 रोजी प्रकाशित
नाशिकमध्ये ‘बिघाडी’साठी भाजपची सध्या ‘सबुरी’
भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीकास्त्र सोडले असले तरी नाशिकमधील ‘आघाडीत बिघाडी’

First published on: 12-01-2014 at 04:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mns ties in nashik turn sour over raj thackerays remarks on narendra modi