मुंबई : मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी मोर्चा काढण्याची घोषणा केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडावे, या उद्देशाने पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा आदेश रद्द करण्यात आल्याचे भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले. डॉ. नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतरच सरकार हिंदीबाबत योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच २०२९च्या विधानसभा निवडणुकांची तयारी, भाजपमधील प्रवेश, महायुतीतील जागावाटप आदी अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणे संवाद साधला.
मराठीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी मोर्चा काढण्याची घोषणा केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरळीत पार पाडावे या उद्देशानेच पहिलीपासून त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा आदेश रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी दिली. ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात बोलताना डॉ. नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आल्यानंतर सरकार योग्य निर्णय घेईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे नुकतीच स्वीकारलेल्या चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व २०२९च्या निवडणुकांची तयारी, भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांचा ओघ, महायुतीतील जागावाटप व भाजपने केलेल्या तडजोडी आदी अनेक मुद्द्यांवर मनमोकळेपणे संवाद साधला. पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राज्यभरात वादंग झाला आणि मराठी-अमराठी वादाला तोंड फुटले. या पार्श्वभूमीवर चव्हाण म्हणाले की, राज्यात मराठीचीच सक्ती असून तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळातच करण्यात आली होती. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने तिसरी भाषा ऐच्छिक ठेवून अन्य भाषांचाही पर्याय दिला. पण विरोधकांनी ‘म’ मतांसाठी आणि ‘भ’ भावनेचा हे उद्दिष्ट ठेवून राजकारण केले. ठाकरे बंधूंनी मोर्चाची हाक दिली. विधिमंडळाचे अधिवेशनही सुरु होणार होते. त्यात गोंधळ होऊन सभागृहाचे कामकाज बंद होऊ नये आणि कायदा व सुव्यवस्थाही सुरळीत राहावी, यादृष्टीने त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करण्याचा निर्णय रद्द केल्याचे चव्हाण म्हणाले.
मिरा-भाईंदरमध्ये मनसेने मराठीच्या मुद्द्यावर मोर्चा आयोजित केला होता. पोलिसांनी मनसेच्या नेत्याला प्रतिबंधक उपाय म्हणून ताब्यात घेतले. त्यांच्याविरोधात मारहाण, धमक्या असे गंभीर गुन्हे दाखल असल्याकडे चव्हाण यांनी लक्ष वेधले. मोर्चाच्या आयोजकांची पार्श्वभूमी पाहून पोलीस आयुक्तांनी आधीच त्यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ताब्यात घेतले असावे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केल्याचे चव्हाण यांनी अधोरेखित केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका न्यायालयाच्या आदेशानुसार होतील आणि महायुती त्या एकत्रच लढेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. आमची कधीही निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी आहे. मराठीच्या मुद्द्याचा जनतेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा दावा त्यांनी केला. मुंबई महानगपालिका निवडणुकीत विकास आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा महत्त्वाचा राहील, असे चव्हाण यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही आमची मातृसंस्था असून त्यांचे आशीर्वाद कायम आमच्याबरोबर आहेतच व ते कायम राहावेत, असे चव्हाण यांनी नमूद केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सूचित केल्याप्रमाणे २०२९च्या निवडणुकांपर्यंत मतांची टक्केवारी ५१पर्यंत नेण्याचे पक्षाचे उद्दिष्ट असेल, असेही चव्हाण यांनी सांगितले.
ठाकरे बंधू किंवा कुटुंब एकत्र आल्याचे स्वागतच आहे. आम्ही एकत्र कुटुंब पद्धती मानणारे आहोत. पण ते राजकारणात किती काळ एकत्र राहतील, हे सांगता येणार नाही. – रवींद्र चव्हाण, प्रदेशाध्यक्ष, भाजप
महत्वाचे मुद्दे
- ठाणे, कल्याण लोकसभा मतदारसंघांशी भाजपचीच नाळ
- हे मतदारसंघ सोडावे लागल्याची खंत
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उदार मनाचे नेते
- खासदार श्रीकांत शिंदे व मी एकाच नाण्याच्या दोन बाजू
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीत एकत्र लढणार
- अन्य पक्षांतील नेते पारखूनच घेतले जातात