महाराष्ट्रात भाजपाचे सरकार येणार नाही, असा विश्वास काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला आहे. मुंबईत शिवसेनेच्या मुखपत्राच्या कार्यालयात जाऊन त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली, त्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते.
दलवाई म्हणाले, राज्यात आम्ही राष्ट्रपती राजवट येऊ देणार नाही. त्यासाठी शिवसेनेशी आमचे हायकमांड चर्चा करीत आहेत. तसेच याबाबत शरद पवार आणि सोनिया गांधी यांनी निर्णय घ्यावा. भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये असे आम्ही म्हणतोय याचा अर्थ बराच आहे, अशा शब्दांत दलवाई यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री करायला काँग्रेसचा हिरवा कंदील असल्याचे सुतोवाच केले आहे.
भाजपाने महाराष्ट्राच्या राजकारणाची, अर्थकारणाची, शिक्षणाची वाट लावली, शेतकऱ्यांची अवस्था बिकट बनली आहे, औद्योगिकरणाची स्थिती वाईट आहे. राज्यात ईडीद्वारे कारवाया घडवून आणल्या जात आहेत. राष्ट्रपती राजवटीची भाषा केली जात आहे. त्यामुळे माझी वैयक्तिक इच्छा आहे की, राज्यात भाजपाचा मुख्यमंत्री होऊ नये, असेही यावेळी दलवाई म्हणाले.
भाजपावर सडकून टीका करताना दलवाई म्हणाले, भाजपाने राज्यात २५० जागा येणार असे वातावरण तयार केले होते. मात्र, जनतेने त्यांना तसा कौल दिलेला नाही त्यामुळे त्यांना सत्ता स्थापन करण्याचा नैतिक अधिकारच राहिलेला नाही, त्यांनी आता विरोधीपक्षात बसावं. भाजपाने देशात धर्मांधतेचं वातावरण आणलं हेच त्याचं राजकारण आणि हिंदुत्व आहे. उलट शिवसेनेचं हिंदुत्व आणि राजकारण यापेक्षा वेगळं आहे. त्यांच्या भुमिकांमध्ये जमीन-आस्मान इतका फरक आहे. अशा स्पष्टीकरणाद्वारे काँग्रेस शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल असल्याचे संकेतही दलवाई यांनी यावेळी दिले.
