मुंबई : मागील काही वर्षांपासून तरुणीमध्ये लघवी करताना जळजळणे, लघवी तुंबणे किंवा काही कळायच्या आतच लघवी होणे, मूत्राशयामध्ये संसर्ग होणे यांसारख्या मूत्राशयाशी संबंधित समस्या वाढत आहेत. मागील चार वर्षांमध्ये तब्बल ३ हजार १९० महिलांमध्ये या समस्या आढळून आल्या असून, त्यातील ७०४ महिलांवर मूत्राशय सिंचन ही प्रक्रिया करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे तरुण महिलांचे असल्याचे आढळून आले आहे.

वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाच्या अखत्यारितील स्त्री रोग आणि प्रसूतीसाठी प्रख्यात असलेल्या कामा रुग्णालयात २०१९ मध्ये बाह्यरुग्ण विभागात युरोगायनॅक म्हणजेच ओटीपोटाच्या आजारावरील उपचारासाठी स्वतंत्र केंद्र सुरू करण्यात आले. सरकारी रुग्णालयातील हे पहिलेच केंद्र आहे. या केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात ओटीपोटाचे आजार आढळतात. त्यावर स्त्रीरोग तज्ज्ञ किंवा मूत्ररोगतज्ज्ञ उपचार करीत आहेत. मात्र, या दोन्ही विषयांतील तज्ज्ञ या विभागामध्ये रुग्णांवर उपचार करीत आहेत. कामा रुग्णालयातील यूरोगायनॅक बाह्यरुग्ण विभागांतर्गत २०१९ ते २०२४ या सहा वर्षांत ३ हजार १९० महिलांवर उपचार करण्यात आले. या महिलांना मूत्राशयासंदर्भात होणाऱ्या आजाराचा व संसर्गाचा कामा रुग्णालयातील डाॅक्टरांनी अभ्यास केला. या अभ्यासामध्ये दरवर्षी महिलांमध्ये मूत्राशयाशी संबंधित संसर्ग होण्याचे प्रमाण वाढत असून यामध्ये तरुणींचे प्रमाण अधिक असल्याचे निदर्शनास आले.

७०४ महिलांवर मूत्राशय सिंचन प्रक्रिया

गेल्या सहा वर्षांत रुग्णालयात आलेल्यांचा करण्यात आलेल्या अभ्यासात महिलांमध्ये निम्म्यापेक्षा जास्त प्रमाण तरुणींचे असल्याचे आढळून आले आहे. मूत्राशयामध्ये संसर्गाचे प्रमाण वाढल्याने रुग्णावर मूत्राशय सिंचन ही प्रक्रिया करावी लागते. या प्रक्रियेमध्ये रुग्णाचे मूत्राशय स्वच्छ केले जाते. मागील सहा वर्षांमध्ये उपचार करण्यात आलेल्या ३ हजार १९० महिलांपैकी ७०४ महिलांवर मूत्राशय सिंचन ही प्रक्रिया करण्यात आल्याचे कामा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

असुरक्षित संभोगामुळे प्रमाण वाढतेय

तरुण महिलांमध्ये मूत्राशयामध्ये संसर्ग होण्यामागे विविध कारणे आहेत. मात्र त्यामागे असुरक्षित संभोग हे एक महत्त्वाचे कारण आहे. या कारणामुळेच तरुण महिलांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. दिवसेंदिवस महिलांमधील या समस्येत वाढ होत आहे. मात्र कामा रुग्णालात ओटीपोटाच्या आजारावरील उपचारासाठी सुरू करण्यात आलेल्या युरोगायनॅक बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या महिलांना दिलासा मिळत असल्याचेही डॉ. तुषार पालवे यांनी सांगितले.