मुंबई : नालेसफाईची कामे पूर्ण करताना यंदा मुंबई महापालिका प्रशासनाची दमछाक झाली आहे. पावसाळा सुरू झाला असला तरी अद्याप नालेसफाईची केवळ ८२ टक्केच कामे झाली आहेत. त्याचबरोबर मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम ६१ टक्के, तर लहान नाल्यातून गाळ काढण्याचे काम केवळ ७२ टक्के झाले आहे. मुंबई शहर आणि उपनगरात सुरू असलेली नालेसफाईची सर्व कामे ७ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री आणि शहरचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले होते. मात्र ही मुदत गाठण्यासाठी पालिकेच्या यंत्रणेला केवळ तीन दिवसांचाच कालावधी उरला आहे.

यंदा मुंबईत लवकरच पाऊस सुरू झाल्यामुळे पावसाळापूर्व कामांवर त्याचा परिणाम झाल्याचा दावा मुंबई महापालिका प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र जून महिना उजाडला तरी यंदा नालेसफाईची कामे आटोक्यात आली नसल्याचे चित्र आहे. मुंबई महानगरातील मिठी नदीसह मोठ्या व लहान नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे अद्याप सुरू आहेत.

दरवर्षी नालेसफाईच्या वार्षिक उद्दिष्टापैकी पावसाळ्यापूर्वी ८० टक्के गाळ उपसा केला जातो. या वर्षी पावसाळ्यापूर्वी एकूण ९ लाख ६८ हजार ००८ मेट्रिक टन गाळ काढण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ७ लाख ९६ हजार ७६५ मेट्रिक टन म्हणजे निर्धारित उद्दिष्टाच्या ८२.३१ टक्के गाळ काढण्यात आला आहे.

यंदाही मार्च महिन्यात गाळ काढण्याची कामांना सुरुवात झाली. मात्र अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत. पहिल्यांदाच मे २०२५ मध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे आगमन वेळेपूर्वी झाल्याचा अंशतः परिणाम नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांवर झाल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे. सर्व प्रमुख नाल्यांमधील गाळ काढण्याची कामे जून २०२५ च्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाली आहेत. तर मिठी नदीतील गाळ काढण्याचे काम सध्या प्रगतिपथावर आहे. याअंतर्गत नदी स्वच्छता आणि वहन क्षमतेत वाढ करण्यास विशेष महत्त्व दिले जात आहे. नदीतून गाळ काढण्याची कार्यवाही अधिक वेगाने करण्यासाठी विविध भागांमध्ये समर्पित पथके आणि यंत्रसामग्री तैनात करण्यात आल्याचे पालिका अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भ्रष्ट कंत्राटदारांवर ३ कोटी रुपये दंड

पावसाळ्यात मुंबईत पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केली जाते. नालेसफाईच्या कामात कंत्राटदारांना कोणतीही चलाखी करता येऊ नये म्हणून यंदा मुंबई महापालिकेने कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) या तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. मात्र तरीही नालेसफाईचा गाळ काढून वाहून नेण्यात कंत्राटदारांनी चलाखी केल्याचे उघड झाले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निरीक्षणाद्वारे साधारणतः ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक दंड कंत्राटदारांना करण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. गाळाचे प्रमाण प्रत्यक्षापेक्षा जास्त दाखवणे, गाळ कमी दाखवणे, गाळामध्ये राडारोडा भरणे अशा प्रकारचे हे फेरफार आहेत. गाळ अजूनही नाल्यातच असताना फेरफार करून कंत्राटदार चलाखी करीत असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे विविध ठिकाणी मिळून ३ कोटी रुपये दंड करण्यात आला आहे.

किती गाळ काढला

१) मोठे नाले …..१०५.८१ टक्के

२) लहान नाले …..७२.१८ टक्के

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३) मिठी नदी ……६१.८५ टक्के