मुंबई : मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांची बदली रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांना तीन वर्षांचा निकष लागू करू नये म्हणून राज्य सरकारने केलेली मागणी निवडणूक आयोगाने मंगळवारी फेटाळली. त्यामुळे चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व अन्य काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आता कराव्याच लागणार आहेत.

हेही वाचा >>> सोमवारपासून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली बाह्यमार्गात बदल

तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांच्या बदल्या करण्याचा आदेश निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात दिला होता. या आदेशामुळे मुंबई चहल यांच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या कराव्या लागणार आहेत. थेट निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसल्याने आयुक्त व अतिरिक्त आयुक्तांना आदेशातून वगळावे, अशी विनंती करणारे पत्र राज्य सरकारने सोमवारी निवडणूक आयोगाला पाठविले होते. मात्र मंगळवारी आयोगाने सरकारची ही विनंती फेटाळून लावली. तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ पदावर असलेल्या महानगरपालिका आयुक्त किंवा अतिरिक्त आयुक्तांची बदली करावीच लागेल, असे स्पष्ट आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. यामुळे चहल यांच्यासह अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे व वेलारासू, पुणे व अन्य काही पालिकांमधील अतिरिक्त आयुक्तांची बदली राज्य सरकारला करावीच लागेल.